१० लाखांची वॉशिंग मशीन तीन महिन्यांत बंद ! दुरुस्तीसाठी अडीच लाखांचा खर्च; चौकशीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन महिन्यापूर्वी १० लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली वॉशिंग मशीन सद्यस्थितीत बंद पडली आहे. एक वर्षाची वॉरंटी असताना त्यावर दुरुस्तीसाठी अडीच लाख रूपये खर्च का केला जात आहे, असा प्रश्न सदस्य रूपेश पावसकर यांनी उपस्थित केला. तर सभापती प्रितेश राऊळ यांनी याबाबत चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करावा असे आदेश दिले.

जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, समिती सदस्य सावी लोके, रुपेश पावसकर, अवनी तेली, सुनील पारकर, यज्ञा साळगावकर, संतोष पारकर, आदींसह खाते प्रमुख उपस्थित होते.

मागील दोन आरोग्य समिती सभेत गाजत असलेला वॉशिंग मशीन खरेदी प्रकरणाबाबत आज सदस्य रुपेश पावस्कर यांनी प्रश्न उपस्थित करून वॉशिंग मशीन ची दुरुस्ती झाली का असा प्रश्न उपस्थित केला यावेळी संबंधित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या मशीनच्या दुरुस्तीसाठी सुमारे अडीच लाखाचा खर्च येणार असल्याची माहिती दिली यावर सदस्य रुपेश पावस्कर यांनी खरेदी करण्यात आलेल्या वॉशिंग मशीनला एक वर्षाची वॉरंटी असताना दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च का केले जात आहे असा प्रश्न उपस्थित करत ही मशीन चांगल्या कंपनीची खरेदी केलेली नाही कमी दर्जाची मशीन खरेदी केली आहे त्यामध्ये शासनाच्या पैशाचा अपव्यय झाल्याचे दिसून येत आहे. तरी याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली.यावर सभापती प्रीतेश राऊळ यांनी चौकशीचे आदेश देत तात्काळ अहवाल सादर करा अशी सूचना केली

प्राथमिक आरोग्य केंद्र निवासस्थानी दुरुस्तीसाठी निधी देऊनही अद्याप बांधकाम विभागाने अंदाजपत्रके तयार केली नसल्याने दुरुस्ती कामाला विलंब होत आहे याबाबत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बांधकाम विभागाने तात्काळ अंदाजपत्रके तयार करावी अश्या सूचना सभापतीनी केल्या .

जिल्ह्यातील अनेक स्मशानभूमीच्या जमिनीचे सातबारा जमीन मालकाच्या नावे आहेत तरी अशा जमिनी ग्रामपंचायतींच्या नावे करण्याबाबत कर्यवाही करावी अशी सूचना सदस्यानी सभेत केली. यावेळी सभेत साथ रोगांचा आढावा घेत जिल्ह्यातील साथ रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अश्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

error: Content is protected !!