सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ‘‘डोळे आहेत म्हणून आपल्याला हे सुंदर विश्व पाहता येते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वर्षातून किमान एकदा प्रत्येकाने डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे. न्यायाधीश, वकील आणि न्यायालयीन कर्मचारी हे एक कुटुंब आहे. जनतेचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे म्हणूनच न्यायव्यवस्थेचे अस्तित्व आहे. त्यामुळे न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सामाजिक बांधिलकीतून राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे,’’ असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी आज येथे केले. सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय बेलीफ कर्मचारी गट-क संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयात आज मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याच उपक्रमांतर्गत पिंगुळी येथील संत राऊळ महाराज ट्रस्टच्या वतीने ६० वर्षांवरील पक्षकारांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले. या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी जिल्हा न्यायालयात झाला. यावेळी डॉ. देशपांडे बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक एस. टी. त्रिपाठी, जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन एस. एस. इंदलकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. जी. देशिंगकर, सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती एस. ए. कानशिडे, श्रीमती एस. जे. पाटील, एस. पी. पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश आर. व्ही. नडगदल्ली, शासकीय रुग्णालयातील नेत्रचिकित्सक डॉ. कौस्तुभ देशपांडे व डॉ. मंदार निळकंठ, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष राऊळ, वर्ग चार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष राणे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक महेश माणगावकर, कोर्ट मॅनेजर प्रशांत माळकर, अधीक्षक एस. डी. गिरकर, श्रीमती पी. ए. सावंत, परमपूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज ट्रस्टचे उपाध्यक्ष दशरथ राऊळ, बेलीफ संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रणिता कोटकर यांनी केले.
डॉ. देशपांडे यांनी, ‘‘मानवी जीवनात डोळ्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विज्ञान जिथे संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. दृष्टीमुळेच आपल्याला सभोवतालचे विश्व अनुभवता येते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याबाबत प्रत्येकाने जागरूक राहिले पाहिजे. न्यायालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच न्यायासाठी येणाऱ्या सर्वसामान्य पक्षकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा संघटनेचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे. अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन वर्षातून किमान एकदा करण्यात यावे.’’, असे आवाहन केले.
प्रमुख जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. संदीप राणे म्हणाले, ‘‘आजच्या बदलत्या जीवनशैलीत डोळ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. मानवी जीवनात दृष्टीला अत्यंत महत्त्व आहे. चांगली दृष्टी असेल, तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही चांगला घडतो. बेलीफ कर्मचारी संघटनेने केवळ कर्मचाऱ्यांपुरता विचार न करता न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांसाठीही मोफत नेत्रतपासणीचा उपक्रम आयोजित केला, ही स्तुत्य बाब आहे.’’
संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गावडे म्हणाले, ‘‘न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करतानाच न्यायालयात येणाऱ्या सर्वसामान्य पक्षकारांसाठीही काहीतरी विधायक उपक्रम राबवावा, हे संघटनेचे स्वप्न होते. संघटनेच्या नेहमीच्या चौकटीबाहेर जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्याचा माझा मानस होता. आज मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या माध्यमातून तो प्रत्यक्षात उतरला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वकील संघटना, न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत आहे.’’











