सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडे प्राप्त झालेला निधी १००टक्के खर्च करण्याच्या दृष्टीने प्रत्येक पंधरा दिवसांनी व्यपगत होणाऱ्या निधी बाबत आढावा द्यावा. प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांनी सभेस उपस्थित राहून निधी खर्चाबाबत सविस्तर आढावा द्यावा. अशा सक्त सूचना आजच्या वित्त समिती सभेत सभापती संतोष साटविलकर यांनी खातेप्रामुखाना दिल्या.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती संतोष साटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा लेखा वित्त अधिकारी अभिजीत पिसाळ, समिती सदस्य सावी लोके, संजय बोबडी, सोनाली घाडीगावकर, शमा हडकर, वर्षा सांभारी, सुप्रिया मेंस्त्री, सुनील कवठणकर आदींसह खाते प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीस अभिनेता नाना पाटेकर, जिल्हा परिषदचे माजी सभापती एस टी सावंत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेत सर्व विभागाच्या खर्चाचा आढावा घेताना सभापती संतोष साटविलकर यांनी कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहता कामा नये, प्रत्येक १५दिवसांनी खाते प्रमुखाने आपल्या विभागाचा अखर्चित राहत असलेल्या निधीबाबत आढावा द्यावा. निधी अखर्चित राहून परत गेल्यास संबंधित विभागाला जबाबदार धरण्यात येईल. अशा सूचना यावेळी दिल्या.
सभेत सदस्यांनी केलेल्या सूचना तसेच मागितलेली माहिती योग्य मिळत नसल्याबाबत सदस्यांनी खंत व्यक्त केली, चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी सभापती साटविलकर यांनी सदस्य सभेत सूचना मांडतात किंवा एखाद्या विषयाची माहिती मागतात त्यावेळी संबंधित विभागाने सूचना लिहून घ्याव्यात व पुढील सभेची वेळ न पाहता चार दिवसात संबंधित सदस्याला योग्य माहिती सादर करावी. चुकीची माहिती देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकार चालणार नाही. अशा सक्त सूचना दिल्या.
मालवण तालुक्यातील हडी खारकुवा तसेच बांदिवडे येथे खारेपाणी शिरून पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बाधित होत आहेत. सुपीक जमीन बाधित होत आहे याबाबत सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तर या ठिकाणी संरक्षक बंधारा बांधण्याची मागणी केली. याबाबत खारभूमी विभागाला लेखी पत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या.












