१२१ शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी, पालकांसमवेत तीव्र आंदोलन छेडणार

आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी दिला इशारा

जि.प.उपमुख्यकार्यकारी अधिकारी व जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची घेतली भेट

कणकवली (प्रतिनिधी) : एकही शिक्षक नसलेल्या जि. प. च्या १२१ शाळांमध्ये व इतर शाळांमधील बदली झालेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक भरती अथवा पर्यायी व्यवस्थेतून शिक्षक उपलब्ध न केल्यास १५ जून रोजी प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर व जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांना दिला.आज जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने सोमवारी पुन्हा पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षांसमवेत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्या शाळांमध्ये नवीन शिक्षक भरती होईपर्यंत स्थानिक डीएड, बीएड बेरोजगार उमेदवारांना जि. प. स्वनिधीतून मानधन तत्वावर नियुक्त करण्याची मागणी आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केली. शालेय व्यवस्थापन समितीलाही अधिकार देऊन त्यांची देखील मदत घेण्याची सूचना केली. त्या १२१ शाळा बंद करण्याचे राज्य सरकारचे धोरण असेल तर ते आम्ही हाणून पाडू असाही इशारा आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी दिला.

     शासनाच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध होणार नाही त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या गंभीर प्रश्नी आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित नसल्याने  ओरोस येथे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेतली. यावेळी ओरोस शिवसेना विभागप्रमुख नागेश ओरोसकर, ग्रा.प. सदस्य बाबू टेंबुलकर आदी उपस्थित होते. 

       यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयात तीन तीन मंत्री आहेत. विशेष म्हणजे शिक्षण मंत्री याच जिल्ह्यातील असून भाजप शिंदे युतीच्या काळात १२१ शाळा शिक्षक नसल्याने बंद पडणार आहेत. या तिन्ही मंत्र्यांना वेळ मिळाला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी लक्ष घालावे आणि लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करावेत. या शाळा बंद पाडण्याचा जर सरकारचा घाट असेल तर तो आम्ही जनतेला सोबत घेऊन हाणून पाडू. त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी यावर ठोस भूमिका घ्यावी असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले. 
      आ.वैभव नाईक पुढे म्हणाले शासनाच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत शिक्षक बदली धोरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील  ७०० पेक्षा जास्त शिक्षक पदे रिक्त झाली आहेत. तसेच १२१ शाळांमध्ये जूनपासून एकही शिक्षक उपलब्ध होणार नाही. मोठ्या शाळांमधील देखील शिक्षक कमी झाले आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. यावर ठोस कारवाई होऊन शिक्षक उपलब्ध न झाल्यास  १५ जून रोजी प्रत्येक शिक्षणाधिकाऱ्यांच्या  कार्यालयात विद्यार्थी आणि पालकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  आ. वैभव नाईक यांनी दिला. 
         सतीश सावंत म्हणाले, १२१ शाळा शिक्षकांविना असणे म्हणजे कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे शासनाचे जे धोरण आहे. त्याला एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचा हा प्रकार आहे.  आंतरजिल्हा पद्धतीने शिक्षकांची  बदली करायची होती तर याआधीच रखडलेली  शिक्षक भरती करणे आवश्यक होते. खाजगी शाळा चालण्याचे राज्य सरकारचे हे  धोरण आहे. गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना खाजगी शाळेत शिक्षण घेणे परवडणारे नाही.शिक्षण मंत्र्यांच्या जिल्हयात शिक्षणाचा हा खेळखंडोबा होत आहे. टीईटी परीक्षेत जिल्ह्यातील परीक्षार्थी पात्र न झाल्याने भविष्यात जी शिक्षक भरती जिल्ह्यात होणार ती जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांची होणार आहे. त्यामुळे पुन्हा काही वर्षांनी हीच परिस्थिती उदभवणार आहे.जिल्ह्यातील डीएड बीएड धारकांना संधी मिळण्यासाठी कोकणसाठी वेगळे धोरण शिक्षण मंत्र्यांनी राबविण्याची गरज आहे. तरच जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा टिकणार आहे असे सतीश सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!