संदिप परब यांच्या रूपाने पंढरीचा पांडुरंगच रस्त्यावरील निराधारांच्या वेदना दूर करण्यासाठी धावतो !

ज्येष्ठ साहित्यिक, कवी, गीतकार प्रसाद कुलकर्णी यांचे गौरवोद्गार;

फोंडाघाट येथे ‘स्नेहसिंधू आश्रमा’ची पुनश्च सुरुवात

फोंडाघाट (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार, बेघर, वंचित आणि दुर्लक्षित बांधवांना मायेचा आधार देत त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या जीवन आनंद संस्था आणि स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट, ता. कणकवली येथे ‘स्नेहसिंधू आश्रमा’ची पुनश्च सुरुवात करण्यात आली आहे. या आश्रमाच्या कार्याला आर्थिक आणि सामाजिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने जीवन आनंद संस्था आणि फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी यांच्या माध्यमातून ज्येष्ठ लेखक, कवी, गीतकार आणि साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘आनंद यात्रा’ या धमाल विनोदी एकपात्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे सादरीकरण केले. रस्त्यावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या जखमी,आजारी, निराधार, बेघर व्यक्तींना आधार देण्यापासून ते त्यांचे पुनर्वसन करून त्यांना माणुसकीचे आणि सन्मानाचे जीवन मिळवून देण्यापर्यंत संस्थेकडून करण्यात येणाऱ्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

संस्थेच्या कार्याने प्रभावित होऊन ज्येष्ठ साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी संदिप परब यांच्या कार्याचा गौरव करताना, “संदिप परब यांच्या रूपाने पंढरीचा पांडुरंगच रस्त्यावरील निराधारांच्या वेदना आणि दुःख दूर करण्यासाठी धावतो,” असे भावपूर्ण उद्गार काढले. निराधारांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

‘आनंद यात्रा’ या कार्यक्रमातून प्रसाद कुलकर्णी यांनी हलक्याफुलक्या विनोदांची पखरण करत जीवनाकडे आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला. हास्य-विनोदाच्या माध्यमातून जीवनातील आनंदाचे महत्त्व उलगडून दाखविणाऱ्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्याची जोड लाभली. यावेळी मुलांवर बालपणापासूनच योग्य संस्कार होणे आवश्यक असल्याचे सांगताना, सक्षम, जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी पालकांनी सजग राहिले पाहिजे, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला आश्रमाच्या कार्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे प्रमुख अतिथी संजय आंग्रे, राजू पटेल, संदेश पटेल, रंजन नेरूरकर, संतोष जोईल, आर्या भोगलेमॅडम, पारकर सर, विजय शेट्टी, संजना आंग्रे, अक्षता कांबळी, पत्रकार कुमार नाडकर्णी, महेश सावंत, विलास गुरव, नारायण सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी आणि आश्रमाच्या कार्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त जितेंद्र परब आणि किसन चौरे यांच्यासह समन्वयक शैलेन्द्र कदम, दत्तगुरू गावकर हे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे आशिष कांबळी, तुषार परब, श्री. म्हापणकर, अनुराधा चिरमुले, श्री. व श्रीमती लोट, पूर्वा सामंत आणि आशिकी राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्नेहसिंधू आश्रमाच्या पुनश्च सुरुवातीमुळे निराधार बांधवांना मायेचा निवारा, आपुलकीची साथ आणि सन्मानाने जगण्याची नवी उमेद मिळावी, हीच या उपक्रमामागील भावना आहे.

error: Content is protected !!