राजधानी दिल्‍लीला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

ब्युरो न्यूज: राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) आज शनिवार सकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. दिल्लीकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून, त्यांची भीषण उकाड्यापासून तुर्त सुटका झाली आहे. नागरिकांची दिवसाची सुरुवात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाने झाली. सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडल्याची माहिती समोर आली आहे. ताशी ४० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील दृश्यमानता कमी झाली होती. पावसामुळे राज्यातील तापमानात कमालीची घट झाली असून, दिवसभरात कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. वादळी पावसामुळे काही काळ विमान सेवा प्रभावित झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्यामुळे सूचना जारी करीत विमानासंबंधीची माहिती घेवूनच घराबाहेर पडण्याचा सल्ला प्रवाशांना दिला होता. खराब हवामानामुळे सकाळी वेगवेगळ्या राज्यातून आयजीआय विमानतळाकडे येणारी चार विमाने जयपूरकडे वळवण्यात आली होती, अशी माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली. राज्याला पावसासंबंधी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयीन भागात पश्चिम विक्षोभाच्या सक्रियतेमुळे पुढील दोन ते तीन दिवस दिल्ली, एनसीआर मध्ये सौम्य पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान सोमवारी आणि मंगळवारी राजधानीतील काही भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज ही वर्तवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!