आशा वर्करस युनियनने जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा नेत केली मागणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आशा व गटवर्तक यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा किमान २८ हजार रुपये मासिक पगार द्या. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्करस युनियनच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आशा वर्कर्स युनियनच्या अध्यक्ष प्रियंका तावडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात स्वप्नाली चव्हाण, कांचन देऊलकर, रुचिका पवार, विद्या सावंत, आरोही पावसकर, अंकिता कदम, सुप्रिया गवस, आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, दरमहा किमान २८ हजार रुपये मासिक पगार द्या, सेवा समाप्तीनंतर पाच लाख रुपये एक रकमी ग्रॅज्युएटी द्या, सेवा समाप्तीनंतर मासिक दहा हजार रुपये पेन्शन द्या ,आशा व गटवर्धक कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण परिवारास आरोग्य सोयी सुविधा मोफत द्या, यासह विविध मागण्या या निवेदनातून शासनाकडे करण्यात आल्या आहेत. आज जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध घोषणाद्वारे आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.