आमदार वैभव नाईक यांचा टोला
कुडाळ (अमोल गोसावी) : ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून जनतेला काही मिळाले नाही.फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले प्रमाेशन करण्यासाठी केला. यात आर्थिक उधळपट्टी मात्र झाली. शासनाचे दोन ते तीन कोटी रुपये पाण्यात घालण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. अशी खरमरीत टीका आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर केली. कुडाळ शिवसेना शाखेत पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही नवीन अशा घोषणा आज करण्यात आल्या नाहीत. फक्त हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि राणे कुटुंबीयांनी आपले लॉन्चिंग करण्यासाठी केला,असा टोलाही त्यांनी लगावला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर उपस्थित होते.
यावेळी आमदार नाईक म्हणाले की, मंडप उभारणीसाठी, एसटी बसच्या सोय, पाणी, आसन व्यवस्था सोयीसुविधांसाठी प्रशासन मागील आठ दिवस झटून काम करीत आहे. पण प्रशासन शासनाच्या पैशाचा चुथडा करीत आहेत. आज अनेक शासकीय कार्यालयात दिवसभर कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नव्हता. आज शासन आपल्या दारी कार्यक्रमात केवळ योजनांची पत्र दिली गेली. या योजना खरे तर उद्वव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेल्या आहेत. त्यांची पत्र आज देण्यात आली. मुख्यमंत्र्यानी वर्षभरात जवळ ६६३ कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. परंतु, जवळपास हजार कोटीच्या कामे मुख्यमंत्र्यानी थांबविली आहेत. ती कामे सुरू करण्याची कामे केलेली नाही. कुठल्याही जिल्ह्याच्या विकासाठी नवीन घोषणा केल्या नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता त्यांना ओळखून पार झालेली आहे. कारण नवीन अशा घोषणा शासन आपल्या दारी कार्यक्रमातून देण्यात आल्या नाहीत. या सर्व जुन्या योजना आहेत. मालवण, कणकवलीमधील लाभार्थ्यांना येथे आणून पत्र देण्यात आली. आज कर्ज कोणाला देण्यात आली ? तर ती भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आली. सर्वसामान्य माणसांना काय दिले? असा सवालही उपस्थित करण्यात आला. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम खर तर लोकांना दारोदारी फिरण्यासाठी केलेला प्रयत्न होता. यांच्या सभांना लोक येत नाहीत. त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांना एकत्र आणून दाखवायचे होते.