‘शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम !

जगाला देखील हेवा वाटेल अस कोकण निर्माण करण्याचा आपण संकल्प करुया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

कुडाळ (अमोल गोसावी) : शासन आपल्या दारी’ हा क्रांती आणणारा कार्यक्रम असून आजच्या कार्यक्रमामुळे सर्व विक्रम मोडले गेले आहेत, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुडाळ येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या उद्घटनाप्रसंगी केले.

कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन भव्य दिव्य असे करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना ‘माका गर्दी बघून आनंद झालो’ या मालवणी भाषेतून सुरुवात केली. कोकणातील माणूस फणसासारखा म्हणजे बाहेरून काटेरी आणि आतून गोड असा आहे. सिंधुदुर्ग हा लहान जिल्हा असला तरी लाभार्थी संख्या सर्वाधिक आहे. आता प्रशासन आणि सरकार यांच्यातील अंतर मिटवून टाकण्यासाठी शासन आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे.

असा कार्यक्रम राज्याच्या इतिहासात प्रथमच हे सर्वसामान्यांचे सरकार असून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राज्यातील इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील १० महिन्याच्या कालावधीत या सरकारकडून ६७९ कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता मिळाली आहे.शिंदे-फडणवीस सरकार सर्वसामान्यांचे असून जनतेला काय पाहिजे हे ऐकून घेणारे सरकार आहे. केवळ कागदी घोडे नाही तर खरे घोडे आम्ही नाचवतो असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. प्रत्यक्ष कृतीतून काम करणारे आमचे सरकार असून हे तुमच्या मनातले आणि हे लोकाअभिमुख सरकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.आमचे सरकार महिलांचे बचतगट तसेच महिलांसाठी योजना यावर अधिक भर देत असून एमएसएमईच्या माध्यमातून युवा पिढीला नोकऱ्याही देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार मागे हटणार नाही
कोकणचा विकास असा झाला पाहिजे की, जगाला त्याचा हेवा वाटला पाहिजे. कोकणातील पर्यटनासाठी प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. त्या दृष्टीने कोकणात नवनव्या योजना राबविण्यात येणार आहेत. केंद्र व राज्य सरकार एकत्र येवून काम करणारमागील दहा महिन्यापासून राज्यातील सरकार तसेच केंद्रातील मोदी सरकार हातात हात घालून काम करीत आहे. मुख्य म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असल्याने विकासाला चालना मिळत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार रवींद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, ब्रिगेडीअर सुधीर सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे आदी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार : केंद्रीय मंत्री नारायण राणे

कोकणात रोजगार आरोग्य व्यवसाय याला चालना मिळण्यासाठी आवश्यक तो निधी केंद्र तसेच राज्य सरकारकडून मिळत आहे. मात्र मागील अडीच वर्षांपूर्वी झालेले मुख्यमंत्री हे लोकांना भेटत नव्हते. पण आता शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेचे सरकार आले असून याची जाणीव येथील नागरिकांना आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न सव्वा दोन लाख असून नवनवीन उद्योग तसेच बचतगटांना प्राधान्य दिले जात आहे. महिन्याभरात सिंधुदुर्गात ट्रेनिंग सेंटर होणार असून यासाठी २०० कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. एमएसएमईच्या माध्यमातून राज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार लागेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.

शिंदे-फडणवीस सरकार हे जनसामान्यांचे असून सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वजण काम करीत आहेत. हे डबल इंजिन सरकार असल्यामुळे सामान्यांना याचा लाभ मिळत आहे. सरकारी काम बराच वेळ थांब याला बगल देण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. लवकरच सिंधुदुर्गातही एसी एसटी बसेस धावतील. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असल्याचे रवींद्र चव्हाण यावेळी म्हणाले. तर आत्ताचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकार आणि सर्वसामान्य जनतेमधी दुवा आहेत, असेही पालकमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!