ओझर विद्यामंदिर संस्था चालकांनी जाणून घेतली वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळा!

मसुरे प्रतिनिधी) : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, व शिक्षक यांनी पुण्यातील शिरूर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुप्रसिद्ध जिल्हा परिषद वाबळेवाडी, शाळेला नुकतीच भेट देऊन अभ्यास दौरा पूर्ण केला. वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा ही तेथील शिक्षक, पालक, आणि ग्रामस्थांनी मिळून उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर जगाच्या नकाशावर झळकवली आहे. शाळा पूर्णपणे सौर उर्जेवर चालत असून जगातील तिसरी आणि भारतातील पहिली ‘झिरो एनर्जी स्कूल’ म्हणून वाबळेवाडी शाळेचा उल्लेख केला जातो. सुरुवातीला वारे गुरुजींनी तिथे शिक्षणाचे वारे निर्माण करून वाऱ्याच्या वेगाने विकास घडवून आणला. शालेय अभ्यासाबरोबरच तंत्रज्ञान वृक्ष लागवड विविध स्पर्धा परीक्षा यामध्ये तेथील विद्यार्थी आघाडीवर असतात. आज त्या शाळेतील विद्यार्थी सर्वच क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत. वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा विकसित होण्यासाठी तेथील शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी कोणकोणत्या प्रकारचे उपक्रम राबवले? विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला गेला? शाळेसाठी ग्रामस्थांनी कोणता त्याग केला? शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये कसा समन्वय साधला जातो? या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी ओझर विद्यामंदिरने या शाळेचा अभ्यास दौरा केला. तेथील शैक्षणिक प्रगतीचा पॅटर्न आपल्या प्रशालेमध्ये राबविता येईल का? किंवा तुलनात्मक अभ्यास करून आपल्याकडील प्राप्त परिस्थितीला अनुसरून शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवता येतील, या दृष्टिकोनातून केलेला हा अभ्यास दौरा शाळेमध्ये नवनवीन बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण होता. ओझर विद्यामंदिर चे मुख्याध्यापक डी. डी. जाधव तसेच सहाय्यक शिक्षक प्रवीण पारकर यांनी वाबळेवाडी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक पालक व ग्रामस्थांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन वाबळेवाडी शाळेच्या विकासाची अंगे समजून घेतली. वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, तसेच दत्तात्रय बारगळ, सुनील पालांडे यांनी वाबळेवाडी शाळेविषयी सविस्तर माहिती दिली. या अभ्यास दौऱ्यामध्ये मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, संस्था संचालक शरद परब, गंगाराम सुर्वे, शांताराम परब, ओझर विद्यामंदिचे मुख्याध्यापक डी. डी. जाधव, उपक्रमशील साहाय्यक शिक्षक प्रविण पारकर यांचा समावेश होता. शाळेच्या परिवर्तनासाठी ‘पंचवार्षिक विकास आराखडा’ तयार करून ओझर विद्यामंदिरचा कायापालट करणार असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!