सिंधुदुर्गनागरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष पदी सुजित जाधव (कणकवली),जिल्हा सरचिटणीस पदी चंद्रसेन पाताडे (सुकळवाड-मालवण) व जिल्हा कोषाध्यक्ष पदी नामदेव जाधव (कणकवली) यांची पुन्हा एकदा पुढील काळासाठी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या सभेत सन २०२३ ते २०२६ करीता जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया घेण्यात आली.यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून ऍड.अनिल निरवडेकर यांनी तर विजय चव्हाण यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.यावेळी मागील तीन वर्षांच्या काळात विद्यमान पदाधिकारी सुजित जाधव,चंद्रसेन पाताडे व नामदेव जाधव यांनी उत्तम कामकाज केल्याने सभागृहाने पुन्हा एकदा तिन्ही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड केली.विद्यमान कार्यकारीणीने संत रविदास भवन निर्मितीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्यासाठी वाटचाल केली.तसेच समाजातील गुणवंतांचा सन्मान,अनेक सामाजिक प्रश्न हाताळण्यात पुढाकार असे ध्येय धोरणाशी निगडित कामकाज केल्याने या तिन्ही पदाधिकारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.या पदाधिकारी यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.