सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सुशांत खिलारे याला कराड येथे ठार मारून आंबोली च्या दरीत त्याचा मृतदेह फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आणखी 5 आरोपींना 13 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी याकामी यशस्वी युक्तिवाद केला. सुशांत खिलारे खूनप्रकरणात आबासो ऊर्फ अभय बाबासो पाटील (वय ३८ ता. वाळवा, जि. सांगली ) प्रविण विजय बळिवंत (वय २४ ,ता. वाळवा, जि. सांगली.), राहुल कमलाकर माने (वय २३ ,रा.गोळेश्वर मानेवस्ती कराड, ता. कराड, जि. सातारा ) या 3 आरोपींना 5 फेब्रुवारी रोजी तर स्वानंद भारत पाटील (वय ३९ , रा. इस्लामपुर, ता. वाळवा, जि. सांगली ), राहुल बाळासाहेब पाटील (वय ३१ वर्ष, रा. बहे, ता. वाळवा, जि. सांगली ) या आणखी 5 आरोपींना तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या पथकाने 5 आणि 6 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. या पाचही आरोपींना आज जिल्ह्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे मांडत पोलीस कोठडीची मागणी केली. यापूर्वी अटकेत असलेला आरोपी तुषार माने व पकडण्यात आलेले 5 आरोपी यांचे मयत सुशांत खिलारे यांच्या मृत्यूनंतर प्रेताची विल्हेवाट लावण्याबाबत एकमेकांशी मोबाईलवर संभाषण सुरू होते.सबब या पाचही आरोपींच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करायचे आहेत. आरोपींनी मयताला मारण्यासाठी वापरलेले पट्टे, दांडे जप्त करायचे आहेत, मयताचा मृतदेह कोणत्या गाडीने घटनास्थळापर्यंत आणला याचा तपास बाकी आहे, मयताला मारलेल्या जागेचा पंचनामा करायचा आहे. वरील मुद्द्यांद्वारे सरकारी वकील देसाई यांच्या युक्तिवाद ग्राह्य धरत जिल्हा न्यायालयाने पाचही आरोपींना 13 फेब्रुवारीपर्यंत 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली.