मृत युवक वेताळ बांबर्डेतील ; पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
चौके ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथून बेपत्ता असलेल्या सचिन मधुकर घाटकर (वय- ३०) या युवकाचा मृतदेह आज सकाळी धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात झाडास गळफास लावलेल्या स्थितीत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिसून आला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती अशी की, वनविभागाचे कर्मचारी आज धामापूर येथील बैरागी कासारटाका मंदिर लगतच्या जंगलमय भागात फिरती गस्त घालत असता त्यांना एका झाडास गळफास लावलेल्या स्थितीत युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी याची माहिती मालवण पोलीस ठाण्यास दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. ए. सुतार, कट्टा पोलीस दूरक्षेत्रचे पी. बी. मोरे, सुहास पांचाळ, सिद्धेश चिपकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात हा मृतदेह कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील सचिन मधुकर घाटकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. हा युवक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याबाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पी. बी. मोरे अधिक तपास करत आहेत.