साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांचा कणकवली येथे अखंड लोकमंचच्या वतीने नागरी सत्कार
माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते करण्यात आले सन्मानित
कणकवली (प्रतिनिधी) : सर्वसामान्य माणसं संभ्रमित होऊन जगत असताना एखादा लेखक वास्तव मांडतो आणि त्याला जेव्हा त्याच्या माणसांकडून प्रोत्साहन मिळतं ते ऊर्जा देणारं असतं. समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या टोकावर मांडण्यासाठी मी लेखन करतो. मुकेपणाने जगणाऱ्या साऱ्या माणसांचा हा सन्मान आहे, असे भावपूर्ण उद्गार साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी काढले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर यांचा कणकवली येथे अखंड लोकमंचच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यांच्या हस्ते प्रवीण बांदेकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अखंड लोकमंचचे नामानंद मोडक, नाट्यलेखक शआफत खान, ज्येष्ठ कवी प्रा.डॉ. गोविंद काजरेकर, जेष्ठ कवी मोहन कुंभार, प्रा. डॉ. शरयू आसोलकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, आमदार वैभव नाईक, गटनेते सुशांत नाईक तसेच यावेळी साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. देशपातळीवर सन्मान मिळविणाऱ्या साहित्यिकाचा कणकवलीत सन्मान होतोय. कातकरी समाजासाठी काम करणाऱ्या अखंड लोकमंच ने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून प्रवीण बांदेकर यांचा केलेला सन्मान ही मोठी गोष्ट आहे, असे उद्गार समीर नलावडे यांनी काढले. प्रा. गोविंद काजरेकर यांनी प्रवीण बांदेकर यांचा प्रवास मांडला. सामाजिक दुःखाचा प्रत्ययकारी आविष्कार प्रवीण बांदेकर यांच्या साहित्यकृतीतून प्रत्ययास येतो. कादंबरीकार या नात्याने त्यांचे साहित्याला मोठे योगदान आहे. पूर्वजांनी सोसलेल्या दुःखाचा आढावा घेऊन बांदेकर यांनी लेखन केले आहे. त्यांची चाळेगत कादंबरी कोकणातील विनाशकारी संक्रमणाचे चित्रण मांडते. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ मध्ये आधुनिक हिंसक राष्ट्रवादाचे चित्रण केले आहे. आक्रमक, धर्माधिष्टीत राष्ट्रवाद, विचारवंतांच्या हत्या याचे चित्रण यात केले असून वास्तव चित्रण दाखवण्यासाठी लोककलेचा आधार घेतला आहे. माणसाचा सुन्नतेकडे होणारा प्रवास यातून घडतो. सामाजिक व्यवस्थेवर याद्वारे प्रकाश पाडला असून रुपबंध आणि वास्तव यांचा समतोल आणि विविध भाषारुप, मालवणी भाषेचा वापर ही या कादंबरीची वैशिष्ट्ये असल्याचे काजरेकर म्हणाले. एन गोवा 24×7 चे संपादक प्रभाकर ढगे यांनी साहित्यिकांचे समाजबद्दलचे योगदान काय आहे, याविषयी मत मांडले. समाजाच्या सृजनासाठी समाजाला अस्वस्थ करण्यासाठी जो लिहितो, अशा लेखकांच्या मांदियाळीत प्रवीण बांदेकर यांचे नाव आहे. ज्याला मानवी मनाचं जागतिकीकरण करणं जमतं ते साहित्य जागतिक होतं. जुन्या पूर्वसूरींच्या वाटेवर चालत असताना बदलत्या जगाचं प्रतिबिंब साहित्यात उतरलं तर ते जागतिक होतं, बांदेकर यांचे साहित्य त्या कॅटेगरीत येतं. आपल्या साहित्यातून उत्तमोत्तम मोनालीसा निर्माण व्हाव्यात आणि त्यातून एक गूढ हास्य उलगडणारं साहित्य समोर यावं, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. प्रवीण बांदेकर यांच्याकडे ज्ञानपीठ पुरस्कारापर्यंत जाण्याची क्षमता आहे, असे म्हणत प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी शुभेच्छा दिल्या. कोकण, इथली समाजव्यवस्था, बदललेलं राजकारण यांचं प्रवीण बांदेकर त्यांनी केलेलं चित्रण खडबडून जागं करतं. या साहित्याचा आवाका खूप मोठा आहे, असे सांगत नाट्यलेखक शआफत खान यांनी प्रवीण बांदेकर यांना शुभेच्छा दिल्या.
ज्या भूमीमधून आपण श्वास घेतो त्या भूमीत झालेला सत्कार हा मोठं मोल असणारा आहे. कणकवलीत झालेला सत्कार हा संपूर्ण जिल्हावासीयांनी केलेला सत्कार आहे. माझ्या साहित्यिक होण्याच्या वाटचालीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या साहित्यिक मित्र सिद्धार्थ तांबे यांची आज आठवण येते, असे म्हणत बांदेकर यांनी आठवणी जागविल्या. रमाकांत खलप यांच्या हस्ते झालेला सत्कार माझ्या भूमीत झालेला भूमीपुत्राने केलेला सत्कार आहे. झाड मोठं झालेलं दिसतं पण त्याची पाळेमुळे दिसत नाहीत. या पुरस्कारावर तुमच्या साऱ्यांचा अधिकार आहे. आपण जर कोणतेही काम निष्ठापूर्वक, प्रामाणिकपणे करत असू तर कोणीच आपल्याला अडवू शकत नाही. या सन्मानामुळे माझी जबाबदारी वाढली असून ती मी पार पाडायचा पुरेपूर प्रयत्न करेन, असे प्रवीण बांदेकर म्हणाले. विकासाच्या अनेक भूलथापांना भुलून आपलं भविष्य अंधारात ढकलत असणाऱ्या सर्वसामान्य माणसांना विचार करण्यासाठी प्रवीण बांदेकर यांसारख्या लेखकांची आवश्यकता आहे. कोकणाला समृद्ध राजकीय, साहित्यिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सध्या सगळीकडे माणुसकी उकरून काढणारी अनेक गिधाडं फिरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रवीण बांदेकर यांसारख्या लेखकांची गरज आहे, असे ऍड. खलप म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. प्रा. मोहन कुंभार यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी दर्पण प्रबोधिनी, कणकवली नगरपंचायत, नगरवाचनालय, आमदार वैभव नाईक, गटनेते सुशांत नाईक यांच्या वतीने प्रवीण बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांना श्री. खलप यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.