खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि त्यांच्या सहकारींनी गोव्यातील वास्को पोलिस स्टेशनच्या माध्यमातून नुकतेच तीन निराधार व्यक्तींना आधार व सुरक्षेसाठी पणदूरच्या संविता आश्रमात दाखल केले.आपल्या माणसांच्या समाजात मानवाने स्वतःच्या बुध्दीच्या जीवावर अगदी प्राचिन काळापासून गुहेतल्या जीवनापासून ते आजच्या सुरक्षित गृहजीवनापर्यंत मजल मारली. छोट्या झोपड्यांपासून ते मोठमोठाले बंगले आणि टाँवरच्या बिल्डिंगी बांधून माणसाने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या स्थीर आणि सुरक्षित जीवनाची व्यवस्था केली. मात्र मानवी जीवनात विविध कारणांनी स्वतःच्या घरट्यातील कुटुंबासह असलेले सुरक्षित जीवन सर्वांना कायम मिळतेच असे नाही.विविध कारणांनी माणसांना रस्त्यावरचे निराधार वंचित जीवन जगावे लागते.
समाजात अनेक कारणांनी माणसांना रस्त्यावरचे निराधार आणि वंचित जीवन नशिबी येते. अशा रस्त्यावरील निराधार माणसांचे दुःख आणि वेदना संदिप परब यांची जीवन आनंद संस्था समजून घेते.त्यावर उपाययोजना करण्याचे काम कार्यकर्ते करतात.वास्को बाजारपेठे नजिक दोन पुरूष आणि एक महिला रस्त्यावर आश्रय आणि नियमित अन्नपाण्याशिवाय राहत असल्याबाबत वास्को पोलिस स्टेशनमधून संदिप परब यांना फोन आलेला. या फोन काँलची तात्काळ दखल घेत संदिप आणि त्यांच्या सहकारींनी साईबाबा मंदिरातून मुन्नीमल या महिलेला आणि एचडिएफसी बँकेजवळून सय्यद अहमद व महिंद्र या निराधार व्यक्तींना ताब्यात घेवून पोलिसांच्या मदतीने संविता आश्रमात दाखल केले. ज्यांचे या जगात काळजी घेण्यासाठी कोणी नाही. त्यांच्यासाठी जीवन आनंद संस्था आहे.असे बोधवाक्यच आहे जीवन आनंद संस्थेचे.या उक्तीनुसार संविता आश्रमचे कार्यकर्ते या बांधवांची सर्वोत्तोपरी काळजी घेत आहेत.