ओरोस (प्रतिनिधी) : काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार स्थानिक श्रेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधीतून सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी 22 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.सिंधुदुर्ग जिल्हारुग्णालयात दंतविभाग कार्यरत आहे परंतू या विभागात दात काढण्यापलिकडे कोणतेही उपचार होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपल्या दातावरील उपचार करण्यासाठी महागड्या खाजगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात किंवा उपचार न करताच दातांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, कुडाळ तालुका काँग्रेस अध्यक्ष अभय शिरसाट,जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू,कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्षा व महिला बालकल्याण समीती सभापती आफ्रिन करोल इत्यादी काँग्रेस पदाधिकारी यांनी जिल्हारुग्णालयालयात जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांची भेट घेऊन दंतविभागात होणाऱ्या उपचारांची माहिती घेतल्यावर जिल्हा रुग्णालयाच्या दंतविभागात दात काढण्याशिवाय कोणतेही उपचार होत नाहीत अशी धक्कादायक महिती मिळाली. या संदर्भात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांना जिल्हा रुगणालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. या विनंतीनुसार खासदार कुमार केतकर यांनी त्यांच्या खासदार स्थानिक श्रेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 22 लाख रुपयाचा निधी मंजूर केला. या निधीतून जिल्हारुग्णालयातील दंतविभागाचे बळकटीकरण झाल्यावर दात काढण्याबरोबरच पूर्ण रूट कॅनाल करणे, दात तयार करणे,दात बसविणे, क्राऊन कॅप बसविणे, कवळी बसवणे त्याच बरोबर दातांच्या छोट्या शस्त्रक्रिया इत्यादी उपचार या विभागात होणार आहेत. त्यामुळे गरीब गरजू रुग्णांना खाजगी महागड्या रुग्णालयात जावे लागणार नाही.
या संदर्भात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांच्याशी संपर्क साधला असता इर्शाद शेख यांनी सांगीतले की, जिल्ह्य़ातील चार चार मंत्री सत्तेत आहेत कोट्यावधीचा निधी आणल्याच्या बाता मारत असतात परंतू जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा व्हेंटीलेटरवर आहे त्याकडे लक्ष देण्यासाठी यांना वेळ नाही किंवा आरोग्य यंत्रणेसाठी पैसे उपलब्ध करून त्यातून टक्केवारी मिळणार नाही म्हणून जिल्ह्य़ातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न होत नसावेत अशी खोचक टिका इर्शाद शेख यांनी केली. काँग्रेस पक्ष सत्तेत नसताना सुद्धा जिल्हारुग्णालयाच्या दंतविभागाच्या बळकटीकरणासाठी काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर यांच्या खासदार निधीतून 22 लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याचे इर्शाद शेख यांनी सांगीतले.