सावंतवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण अभ्यास शिबिराचा उदघाटन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय निरवडे येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला गावचे प्रथम नागरिक सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी कदम, तलाठी एस.एस.परब तसेच सर्व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक प्रा. अमर निर्मळे यांनी केले. प्रास्ताविकामध्ये समाजकार्य शिकत असताना ग्रामीण भागातील वेगवेगळ्या घटकासोबत काम कसे करावे, ग्रामीण भागातील समस्या नेमकेपणाने ओळखता यावी यासाठी याचे नियोजन करण्यात येते, याबाबत सर्व महिती दिली तसेच या शिबिरात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येणार आहे, याबाबत माहिती दिली. सरपंच सुहानी गावडे आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या.
उदघाटन सोहळा संपन्न झाल्यावर समाजकार्य विभागाच्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या कामाची पद्धत निरवडे ग्रामसेविका यांनी समजावून सांगितली. यानंतर समाजकार्य विद्यार्थ्यांनी निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली. तेथील डॉ. म्हस्के वैद्यकीय अधिकारी व श्री. परब यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्याचे स्वरूप तसेच सेवा सुविधा याबाबत माहिती दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. माया रहाटे तसेच प्रा. पूनम गायकवाड यांनी मेहनत घेतली. या शिबिरात समाजकार्य विभागाचे प्रथम वर्षाचे 28 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातील बालकांसाठी, युवकांसाठी, महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम हे विद्यार्थी राबवणार आहेत. या ग्रामीण अभ्यास शिबिराच्या नियोजनासाठी सिंधुदुर्ग उपपरिसर प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग यांचे मार्गदर्शन लाभले.