श्रेयस अय्यर, केएल राहुलची धडाकेबाज शतके, भारताचा 410 धावांचा डोंगर

मुंबई (ब्युरो न्युज) : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या धडाकेबाज शतकाच्या बळावर भारताने 410 धावांचा डोंगर उभारला. बेंगलोरच्या मैदानावर भारतीय फलंदाजांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 410 धावा उभारल्या. राहुल आणि अय्यरने शतके ठोकली. तर रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली याने अर्धशतके ठोकली. भारताच्या फलंदाजांनी 50 षटकात 16 षटकार आणि 37 चौकार लगावले. नेदरलँड्सला विजयासाठी 411 धावांचे आव्हान आहे.

मधल्या फळीतील गुणवंत फलंदाज श्रेयस अय्यर याने नेदरलँड्सविरोधात शतक झळकावले. रोहित-गिलकडून चांगली सुरुवात मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. अय्यरने चौथ्या स्थानावर भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. अय्यरने आधी विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. त्यानंतर केएल राहुल याच्यासोबत द्विशतकी भागिदारी करत धावसंख्या वाढवली. श्रेयस अय्यरने 94 चेंडूत नाबाद 128 धावांची खेळी केली. या खेळीत अय्यरने 5 षटकार आणि 10 चौकार ठोकले. अय्यरचे विश्वचषकातील पहिले शतक होय.

-केएल राहुल याने पाचव्या क्रमांकावर शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरोधात राहुलला शतकाने हुलकावणी दिली होती. पण आज बेंगलोरच्या मैदानावर राहुलने शतक ठोकले. केएल राहुलने 62 चेंडूत शतक ठोकले. राहुलने 4 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. राहुलने अय्यरसोबत द्विशतकी भागिदारी केली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. 11.5 षटकात शतकी भागिदारी करत वेगवान सुरुवात केली. शुभमन गिल याने 32 चेंडूत झटपट अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. शुभमन गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्मानेही फटकेबाजी केली. रोहित शर्माने 54 चेंडूत 61 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन षटकार आणि आठ चौकार लगावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!