वैभववाडी (प्रतिनिधी): ११ डिसेंबर हा दिवस “जागतिक पर्व दिन” म्हणून साजरा केला जातो. या जागतिक पर्वत दिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भित्तीपत्रक प्रदर्शन व पर्वत पूजनाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. पर्वत संबंधित माहितीच्या भित्तिपत्रकाचे उद्घाटन वैभववाडीचे नायब तहसीलदार दिग्विजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडीचे वनपाल प्रकाश पाटील, कर्मचारी तात्या ढवण, सामाजिक कार्यकर्ते एस पी.परब, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. पृथ्वीतलावर आणि एकूणच मानवी जीवनामध्ये पर्वतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पर्वतांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात पर्वत पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पुष्प अर्पण करून व श्रीफळ वाढवून पर्वत पूजन करण्यात आले. मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये पर्वतांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. अशा या पर्वतांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी जागतिक पर्वत दिन साजरा केला जातो असे प्राचार्य डॉ.सी.एस.काकडे यांनी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.एस.एन.पाटील यांनी केले. तर प्रा.एस.बी.पाटील व डॉ.एन.आर.हेदूळकर यांनी आभार व्यक्त केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना, सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी, महाविद्यालयातील इतिहास विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग व वैभव निसर्ग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.