स्वामी विवेकानंद जयंती ‘युवा दिन’ वैभववाडीत संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिक्षणाने व्यक्तिमत्व विकास होत असतो. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्यातील क्षमता ओळखून त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे वैभववाडीच्या तहसीलदार दीप्ती देसाई यांनी राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग व वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रम सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर वैभववाडीच्या तहसीलदार दीप्ती देसाई, संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे, महामार्ग वाहतूक केंद्र कसाल येथील पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोसावी, उपप्राचार्य डॉ.एम.आय.कुंभार, डॉ.एन.व्ही.गवळी, मार्गदर्शक प्रा.एस.एन. पाटील अमित पवार, कणकवली, सांस्कृतिक विभागाचे प्रा.डी.एस.
बेटकर, एनएसएस विभागाचे डॉ. एम.ए.चौगुले, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे प्रा.पी.एम.ढेरे, श्रध्दा चव्हाण, सुदर्शन खंदारे व अक्षय मोडक हे नेहरु युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.नेहरु युवा केंद्र हे युवकांसाठी काम करणारी एक चळवळ आहे. जिल्ह्यातील युवा शक्तीचे संघटन व त्यांना कौशल्य विकासाचे मार्गदर्शन करण्यात येते. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन युवा शक्तीला राष्ट्र उभारणीत सहभागी करुन घेण्यात येते असे नेहरु युवा केंद्र तालुका समन्वयक श्रध्दा चव्हाण हिने प्रास्ताविकात सांगितले.
स्वामी विवेकानंद आणि त्यांचे कार्य हे युवकांसाठी प्रेरणादायी असे आहे. युवक कसा असावा, राष्ट्र उभारणीत युवकांची भुमिका, विवेकानंद यांना अपेक्षित असलेला युवक या विषयावर प्रा.एस.एन.पाटील यांनी मार्गदर्शन केले.आदर्श चारित्र्य म्हणजे काय, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी यशस्वी जीवनासाठी कशा महत्वाच्या आहेत हे उदाहरणासह श्री.अमित पवार यांनी सांगितले.दि.११ ते १७ जानेवारी हा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो. चारचाकी व दुचाकी वाहन चालवताना घ्यावयाची काळजी, वाहतूकीचे नवे नियम व दंडात्मक तरतुदी याबाबतची सविस्तर माहिती महामार्ग वाहतूक केंद्र कसाल येथील पोलीस उपनिरीक्षक श्री.रामचंद्र गोसावी यांनी दिली.
दुसऱ्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये हर्षदा तावडे व ग्रुप यांनी महाराष्ट्र राज्य गीत, हर्ष नकाशे याने छत्रपती शिवाजी महाराज गीत, पुजा साखरपेकर हिने स्वामी विवेकानंद यांची कविता, मनस्वी शिंदे व ग्रुप यांनी लक्ष गीत, एन.सी.सी.कॅडेट यांनी हम सब भारतीय है हे गीत व समूह नृत्ये यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त लाईव्ह मार्गदर्शन दाखवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक व विद्यार्थी कलाकार यांना नेहरू युवा केंद्राच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संजीवनी पाटील यांनी केले तर आभार प्रा.डी. एस. बेटकर यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग,आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग व एनसीसी विभागाने विशेष परिश्रम घेतले.