” सत्ताधारी पक्षात 15 दिवसात प्रवेश करणार “


निर्धार मेळाव्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांचे सूतोवाच

” माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्यास गप्प बसणार नाही ”  – परशुराम उपरकर

कुडाळ (प्रतिनिधी) : आम्ही मनसे पक्ष सोडला आहे, यापुढे आता पक्ष निरीक्षक व इतर पदाधिकार्यांनी पक्ष वाढवावा, माझ्या सोबत आलेल्या पदाधिकार्यांनी जर कोणी धमकी दिली तर गप्प बसणार नाही,  तुमची वस्त्रे कार्यकर्ते उतरवतील असा इशारा मनसे पदाधिकार्यांना माजी आमदार परशुराम उपरकर यांनी देत, आता जिल्हा वासीयांची सेवा करण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून 15 दिवसात सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. 

कुडाळ येथे माजी आमदार परशुराम उपरकर समर्थकांचा भव्य मेळावा आज पार पडला. यावेळी प्रसाद गावडे, विनोद सांडव,आशिष सुभेदार, बाबल गावडे, आपा मांजरेकर, मंदार नाईक, दीपक गावडे, आदेश सावंत, राजेश टंगसाळी, आबा चिपकर, प्रकाश साटेलकर, बाळकृष्ण ठाकूर, प्रतीक कुबल, संदीप लाड, अमोल जंगले, अभय देसाई, सत्यविजय कविटकर, सदाशिव गुरव, सुंदर गावडे, दत्ता गावडे, विजय जांभळे, गुरू मर्गज यासंह ५०० ते ६०० माजी पदाधिकारी व कार्यकर्ते निर्धार मेळाव्याला उपस्थित होते.

यावेळी परशुराम उपरकर म्हणाले की, मनसेच्या स्थापनेपासून पक्षाचे काम केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळागाळापर्यंत तसेच आजच्या युवापिढीपर्यंत पक्षाची ध्येय आणि धोरणे पोहचविण्यास पक्षासाठी आपण झोकून काम केले. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. परंतु, पक्षाकडून मागील काही वर्षात आम्हाला पूर्णतः दुर्लक्षित ठेवण्यात आले. मात्र, मागील एक-दोन वर्षात पक्षांचे जे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांच्यावर केवळ द्वेषपोटी पक्ष निरीक्षकांनी कारवाई केली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम पक्षातील पदाधिकाऱ्यांनी केले. पक्षात मनमानी कारभार सुरू असून ही आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वता राजीनामे दिलेत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाणार असल्याचे वक्तव्य परशुराम उपरकर यांनी यावेळी केले.

कोणत्या पक्षात जाणार हे लवकरच ठरेल- उपरकर

यावेळी उपरकर म्हणाले की, राज्यात सत्तेत असलेल्या पक्षात आम्ही प्रवेश करू. परंतु, या संदर्भात माझे निष्ठावान कार्यकर्ते जे सांगतील त्या पक्षात प्रवेश होईल. जिल्ह्यातील लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेत जाऊन काम करणे आवश्यक आहे. येत्या १५ दिवसात याबाबत निर्णय होईल.

आम्ही मनसेवर आता कोणतीही टीका करणार नाही. मनसेने जनतेची कामे करावीत आणि आपला पक्ष वाढवावा. मात्र, आता आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत आहेत. जे निरीक्षक येत आहेत त्यांनी आता आमच्यावर टीकाटिप्पणी करू नये. आम्ही तुमच्यासोबत फारकत घेतली आहे. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धमकी माझे कार्यकर्ते समर्थ असतील. मुख्य म्हणजे काही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!