शिरोळ येथील दोन व्हिडीओ खेळगृहे सील
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यामध्ये करमणूक कर कार्यालयाकडून देण्यात आलेले व्हिडीओ खेळगृहाचे परवाने त्यांना मंजूर करण्यात आलेल्या पत्त्यावर असणे आवश्यक असून या कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले असल्यास अथवा अटी व शर्तींचा भंग केल्याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. याबाबत बेकायदेशीररित्या सुरु असलेली व्हिडीओ खेळगृहे आढळून आल्यास नागरिकांनी करमणूक कर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार तथा करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये व्हीडीओ खेळगृह चालविण्यासाठी पोलीस अधिनियम 1951 नुसार जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडून परवाने देण्यात येतात. दिलेल्या परवान्याच्या अटी व शर्तीचे पालन केले जाते अगर कसे याबाबत करमणूक कर शाखेकडून वेळोवेळी तपासणी केली जाते. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी, संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक 13 मार्च 2024 रोजी तहसिलदार तथा करमणूक कर अधिकारी सैपन नदाफ, सहा करमणूक अधिकारी नितीन धापसे पाटील व करमणूक कर निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील सुरेश मल्लू कडाळे यांचा श्री व्हीडीओ खेळगृह व संजय नामपल्ली यांच्या सोनी व्हीडीओ खेळगृहाची अचानक तपासणी केली असता परवान्यामध्ये दिलेल्या पत्त्यावर खेळगृह नसल्याचे दिसून आले. खेळगृह स्थलांतरीत करावयाची असल्यास त्याबाबत रितसर जिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. पण कुरुंदवाड येथील दोन खेळगृह परवानगी न घेता बेकायदेशीररित्या अन्य ठिकाणी स्थलांतरीत करुन सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने या खेळगृहावर कारवाई करून खेळगृह सिलबंद केले.