भरदिवसा दोडामार्ग बाजारपेठेत चोरी
किंमती सामान असलेल्या बॅगकडे केलेलं दुर्लक्ष भोवले
चोरीसारख्या अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहावे – पीआय ओतारी यांचे आवाहन
दोडामार्ग (प्रतिनिधी) : सोन्याच्या दागिन्यांसह अन्य वस्तू असलेली बॅग रस्त्यावर मोटरसायकलवर ठेऊन दुकानात जाऊन खरेदी करणे रसिका गवस यांना चांगलेच महागात पडले असून अज्ञात चोरट्याने भरदिवसा दोडामार्ग बाजारपेठेत बॅग लंपास करून तब्बल 2 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हो चोरी 24 मार्च रोजी सकाळी 11 ते 11 :40 च्या दरम्यान दोडामार्ग बाजारपेठेत घडली. फिर्यादी रसिका सूरज गवस ( वय 39, रा. मांगेली, तळेवाडी, ता दोडामार्ग ) ह्या पुणे येथून होळी साठी आपल्या घरी मांगेली येथे जात होत्या. घरी जाण्याआधी खरेदीसाठी त्या दोडामार्ग मधील श्रीराम मार्केट समोर आपली मोटरसायकल पार्क करून गेल्या. खरेदीला जाताना त्यांनी आपली अमेरिकन टुरिस्टर बॅग दिरा सचिन गवस यांच्या मोटरसायकलवर ठेवून खरेदीला गेल्या. खरेदीहून आल्यावर आपली बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या बॅगेत सोन्याची दोन मंगळसूत्र, सोन्याचा हार, कानातील कुढी, अंगठी, नथ आदी दागिन्यांसह कॅनॉन कंपनी चा कॅमेरा, स्मार्ट वॉच आदी 2 लाख 75 हजारांचा मुद्देमाल होता. रसिक गवस यांच्या फिर्यादीनुसार दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात आयपीसी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार प्रसादि करत आहेत. दरम्यान चोरी सारख्या अप्रिय घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सजग राहून आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक ओतारी यांनी केले आहे.