कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायतवतीने जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कणकवली शहरात पर्यावरण संवर्धन करण्याकरिता दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कणकवली कॉलेज कणकवली, विद्यामंदिर हायस्कूल कणकवली व DAY-NULM च्या कनक सिंधू शहर स्तर संघ कणकवली यांना कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते पर्यावरण दूत म्हणून सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या संस्थानी शहरात वेळोवेळी नगरपंचायतीच्या पर्यावरण, स्वच्छता जनजागृती व इतर नगरपंचायतचे विविध उपक्रमात सहभागी होवून नगरपंचायतला मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमात बचत गटाच्या महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यामध्ये माऊली वस्ती स्तर संघ, जिजाई वस्ती स्तर संघ, नवदुर्गा वस्ती स्तर संघ यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. शहरात स्वच्छतेचे अविरत काम करणारे स्वच्छता कर्मचारी अविनाश तांबे आणि लक्ष्मण तांबे,तसेच शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रकिया करणारे स्वच्छता कर्मचारी समीर मोरे आणि प्रकाश राठोड यांचा स्वच्छता दूत म्हणूनही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावर बोलताना मुख्याधिकारी परितोष कंकाळ म्हणाले की सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये पर्यावरणाचे संतुलन राखणे व त्यासाठी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे तापमानासोबतच प्रदूषणावरही नियंत्रण राखता येते,यासाठी प्रत्येकाने यात सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यामंदिर हायस्कूलचे कला शिक्षक व पर्यावरण सेवा योजनेचे प्रमुख श्री. प्रसाद राणे यांनी उपस्थितांना घरात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी कंपोस्ट खत कसे निर्माण करावे ह्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी, SVEEP अंतर्गत,सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने बाबत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री.कंकाळ यांनी केले तसेच प्रशासकीय अधिकारी श्री.अमोल अघम यांनी उपस्थितांकडून मतदानाची शपथ घेतली.
यावेळी कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, कनक सिंधु शहर स्तर संघ अध्यक्षा श्रीमती. सुचिता पालव, कणकवली नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, किशोर धुमाळे, विनोद सावंत, ध्वजा उचले, कणकवली कॉलेजचे प्रा. सुरेश पाटील, श्री. गावडे, कणकवली नगरपंचायतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी, विद्यामंदिर हायस्कूल व कणकवली कॉलेजचे शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी व बचत गटातील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अमोल भोगले यांनी केले तर प्रस्तावना वर्षा कांबळे यांनी केली व आभार अमोल अघम यांनी मानले.












