मी मोठा, ते लहान, समोरासमोर आल्यावर बंटी पाटलांना मला नमस्कारच करावाच लागेल – हसन मुश्रीफ

मी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. राजकीय घडामोडींपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे जास्त कसे पडतील, यावर विचार करणे अधिक गरजेचे असल्याचे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

यावेळी मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सतेज पाटील यांनी उन्माद दाखवायला नको होता, असे म्हणत आम्ही हा विजय अत्यंत विनयाने साजरा केला असून कुठेही उन्माद दाखवला नाही, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. तसेच, सतेज पाटील हे वयाने माझ्यापेक्षा लहान असल्याने त्यांना मला नमस्कार करावाच लागेल, असे विधानही त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे जिल्ह्यात दोन्ही नेत्यांमधील राजकीय मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दुसरीकडे, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून सुरू असलेल्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘मी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे थेट समर्थन करणार नाही, मात्र त्यांची प्रतिक्रिया ही स्वाभाविक होती.’ पुढील वाटचालीबाबत बोलताना मुश्रीफ यांनी दूध उत्पादकांसाठी आशादायी चित्र मांडले. अधिकारी तुकाराम मुंडे यांनी पुणे आणि मुंबईत केलेल्या धडक कारवायांमुळे दुधातील भेसळ मोठ्या प्रमाणात थांबली आहे. सध्या बाजारपेठ चांगली असल्याने गोकुळच्या दुधाला अधिक चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होऊ शकतो, असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

error: Content is protected !!