असलदे बौद्धवाडी समाज मंदिराचा वीजपुरवठा दोन महिन्यांपासून बंद; ग्रामपंचायत अधिकारी सुशेगात

असलदे (आनंद तांबे) : गावातील बौद्धवाडी येथील समाज मंदिराचा वीजपुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. समाज मंदिर हे सरकारी मालमत्ता असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

समाज मंदिराला महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून गेल्या दोन महिन्यांपासून वीजबिलाचा भरणा न केल्यामुळे स्मार्ट मीटरमधील वीजपुरवठा आपोआप बंद झाला असून समाज मंदिर अंधारात गेले आहे. थकीत वीजबिलामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याची बाब ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तरीदेखील अद्याप वीजबिल भरण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

समाज मंदिरातील वीजपुरवठा बंद असल्यामुळे विविध सामाजिक कार्यक्रम, बैठका तसेच इतर सामाजिक उपक्रम राबविताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी मालमत्ता असलेल्या समाज मंदिराच्या वीजबिलाबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने वेळेत काळजी घेणे अपेक्षित असताना दोन महिने वीजबिल न भरल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार कळवूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने थकीत वीजबिल भरावे आणि समाज मंदिराचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी जोरदार मागणी बौद्धवाडीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!