शिवडाव हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी विकास कार्यशाळा उत्साहात संपन्न

शिवडाव (प्रतिनिधी) : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर चिल्ड्रन्स डेव्हलपमेंट (IACD) आणि शिवडाव माध्यमिक विद्यामंदिर, शिवडाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय विद्यार्थी विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले.दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असल्याने अभ्यासातील एकाग्रता वाढविणे, वेळेचा योग्य उपयोग करणे, अभ्यासाची प्रभावी पद्धत, वक्तृत्व कला, संभाषण कौशल्य तसेच भविष्यातील शिक्षण, नोकरी व व्यवसाय याबाबत योग्य निर्णय कसे घ्यावेत, या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.मार्गदर्शन करताना श्रीकांत सावंत यांनी रॉबिन शर्मा यांचा 90-90-1 नियम, पॅरेटो यांचा 80:20 नियम, आयझेनहॉवर प्रिन्सिपल आणि जपानी ‘IKIGAI’ संकल्पना यांची ओळख करून दिली. या तत्त्वांचा दहावीच्या अभ्यासात प्रभावीपणे उपयोग करून कमी वेळेत अधिक चांगले अध्ययन कसे करता येईल, वेळेचे नियोजन कसे करावे आणि अभ्यासात सातत्य कसे राखावे, हे सोप्या उदाहरणांसह समजावून सांगितले.कार्यशाळेतील विशेष उपक्रम म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एका चिठ्ठीद्वारे विषय देण्यात आला. त्या विषयावर विद्यार्थ्यांनी स्वतःचे विचार मांडायचे होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, विचारशक्ती, वक्तृत्व आणि व्यक्त होण्याची क्षमता विकसित होण्यास मदत झाली.विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी मेहनत, सातत्य, योग्य नियोजन आणि जिद्द या गुणांचा अंगीकार करावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांचा आदर्श दिनक्रम कसा असावा, अभ्यासाबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेळ कसा द्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा दैनंदिन जीवनात उपयोग करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रतिज्ञाही करून घेण्यात आली.या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्रीकांत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच संजय प्रभाकर कर्वे, श्रीकृष्ण सावंत, विलास तेली आणि विद्यालयातील कर्मचारीवृंद यांच्या सहकार्यामुळे कार्यशाळेचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला.या उपक्रमांतर्गत उद्या आणि परवा अनुक्रमे इयत्ता नववी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

error: Content is protected !!