खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्यावर १५ नोव्हेंबर रोजी
मशालीचा भव्य मशाल महोत्सव संपन्न होणार
३०० माशालीचा असणार सहभाग
खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शौर्यशाली परंपरेचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने ‘कोकणचे शिलेदार’ यांच्या वतीने ऐतिहासिक दुर्ग खारेपाटण येथे रविवार, दि.१५ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य-दिव्य अशा मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला सायंकाळी ठीक ५.०० वाजता सुरुवात होणार असून,सुमारे ३०० पेक्षा अधिक मशालींच्या तेजस्वी प्रकाशात संपूर्ण दुर्ग परिसर उजळून निघणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा जागविणे, तसेच तरुण पिढीला गड-दुर्गांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. गड-दुर्ग हे आपल्या इतिहासाचे, स्वाभिमानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांचे जतन व संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश या महोत्सवातून देण्यात येणार आहे.
या भव्य सोहळ्यासाठी सर्व शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, तरुण मंडळी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे जाहीर आवाहन ‘कोकणचे शिलेदार’ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.













