फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग व फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने “स्थानिय विषय आधारित कार्यशाळा” फोंडाघाट महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे कणकवली तालुका समन्वयक अक्षय मोडक यांनी नेहरू युवा केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांची संपूर्ण माहिती दिली. नेहरू युवा केंद्र अनेक प्रकारे युवकांना घडवते. युवकांना प्रशिक्षित करून त्यांच्या हाताला कौशल्य व काम देते असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विष्णू फुलेझेले, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुराद अली शेख, बँक ऑफ महाराष्ट्र फोंडाघाटचे व्यवस्थापक गणेश शिवथरे तसेच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू फुलेझेले यांनी नेहरू युवा केंद्राच्या टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक श्री. गणेश शिवथरे यांनी वित्तीय साक्षरता याविषयी माहिती देताना सांगितले की, डिजिटल बँकिंग, ए.टी.एम. इंटरनल बँकिंग हे सर्व डिजिटल बँकिंग आहेत. बँकिंग गुन्हे होतात. कारण या सिस्टीमबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही. हॅकिंग या प्रकारामुळे हे गुन्हे केले जातात. फिशिंग या प्रकारामुळे सुद्धा फसवणूक केली जाते. फोन करून अनेक प्रकारची माहिती मिळवली जाते. कोणताही ॲप इंस्टॉल करताना काय माहिती जोडत आहोत याचे भान ठेवणे आवश्यक आहे. एकंदरीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी मोबाईल वरील अनेक ॲप तसेच मिळणाऱ्या सुविधांचा नीट अभ्यास केला पाहिजे.
स्थलांतर व उद्येजकता विकास या विषयावर बोलताना मुराद अली शेख म्हणाले की, युवकांनी व्यवसाय करण्याच्या दृष्टीने आपली विचारसरणी तयार केली पाहिजे. शेती बरोबरच अनेक शेतीपूरक उद्योग आहेत त्या उद्योगांना आज बाजारात खूप मागणी आहे. दूध,अंडी, मांस हे पदार्थ सिंधुदुर्गाला इतर जिल्हे पुरवतात. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्याकडे प्रक्रिया न झाल्याने मालाची नासाडी होते. ती टाळून आपला आर्थिक फायदा करू शकतो. हे उद्योग करण्यासाठी लागणारा जो अर्थ पुरवठा आहे तो अर्थ पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बँका तयार आहेत. फक्त त्याची माहिती घेऊन आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले.
सोशल मीडिया व सायबर गुन्हे या विषयावर बोलताना प्रा. डॉ. बालाजी सुरवसे म्हणाले की, तंत्रज्ञान आपणासाठी वरदान जरी असले तरी काही वेळा त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळतात. सायबर क्राईम ही आज एक जागतिक समस्या बनलेली आहे. सायबर गुन्हयाचे पुढील प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते सायबर दहशतवाद, हॅकिंग, अश्लील साहित्य, आर्थिक फसवणूक.
विद्यार्थ्यांनी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करायला हवा. दिवसेंदिवस सेक्सटॉर्शनचे प्रमाण वाढत असून असल्यामुळे अनोळखी व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये तसेच ती स्वीकारू नये.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपली फसवणूक झालीच तर आपण या cybercrim.gov.in या वेबसाईटवर ऑनलाइन तक्रार करू शकतो तसेच 155260 या हेल्पलाइन नंबर वरती सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत फोन करून तक्रार करू शकतो तसेच जवळील पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देऊ शकतो.
आपत्ती व्यवस्थापन या विषयावर बोलताना प्रवीण सुलोकार म्हणाले की, कोणतीही आपत्ती सांगून येत नाही. येणाऱ्या आपत्तीला आपण धीराने सामोरे गेले पाहिजे. हा धीर येण्यासाठी आपल्याला त्याचे प्रशिक्षण आवश्यक असते. मानवी शरीराला पाच टक्के ऑक्सीजनची गरज असते. तोंडाने श्वास देऊन जीवनदान देण्यात येते. छातीवर दाब देऊन हृदय पुन्हा सुरू करता येते. पाच मिनिटाच्या आत सी.पी.आर. सुरू करावे.
कार्यशाळेला वैभववाडी तालुका समन्वयक श्रद्धा चव्हान, कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नांडिस, सुमन मोराळी, महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन बुद्धेश सावंत यांनी तर आभार नेहरू युवा केंद्राचे देवगड तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी मानले.