विशेष संपादकीय
राजन चव्हाण ( सिंधुदुर्ग ) : रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि तत्कालीन राजापूर लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले.भाजपाचा हुकमी एक्का असलेल्या नारायणराव राणे यांनी ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या तळकोकणात ऐतिहासिक विजय संपादन केला. शिवसेनेकडून झालेल्या आपल्या सलग दोन पराभावांचा पुरेपूर वचपा काढतानाच कोकणचा वाघ असलेल्या नारायण राणे यांनी विजयी डरकाळी फोडून टायगर अभी जिंदा है… हे दाखवून दिले आहे. राणेंच्या विजयाने कोकणात काय बदल होतील ह्यादृष्टीने विचार केला तर तळकोकणच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड असणार हे नक्की. दांडगा अनुभव, विकासाचे व्हिजन, दूरदृष्टी आणि महत्वाचे म्हणजे प्रशासनावर तगडी कमांड असलेले नेतृत्व म्हणून नारायण राणेंची ओळख आहे. 40 वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीच्या अनुभवाचा फायदा लोकसभेचे खासदार म्हणून राणे कोकण ला करून देतील हे ढळढळीत सत्य आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कारखाने उभारणी आणि त्यातून रोजगारनिर्मिती च्या आश्वासनपूर्ती शीघ्रगतीने ते नक्कीच करतील. इथल्या स्थानिक बेरोजगारांच्या हाताला स्थानिक पातळीवर रोजगार द्यायला राणे प्राधान्य देतील. त्यासोबत सार्वजनिक हिताचे रखडलेले मध्यम तसेच लघु धरण सारखे अनेक प्रकल्प मार्गी लावताना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा देशात विकास प्रक्रियेत अग्रभागी राहील याचीही दक्षता राणे नक्कीच घेतील. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात सी वर्ल्ड प्रकल्पाचे भिजत घोंगडे पडले आहे.सिंधुदुर्ग ला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर नेऊन ठेवणारा सी वर्ल्ड हा प्रकल्प मार्गी लागून पूर्ण होण्यात अडचण येणार नाही असे तूर्तास तरी वाटते. ज्या गावात सी वर्ल्ड प्रकल्प होणार होता त्या मालवण तालुक्यातील वायंगणी गावतील भूमालक स्थानिकांचाच सगळा कडाडून विरोध होता.लोकसभा निवडणुकीदरम्यान वायंगणी गावच्या सरपंचासह ग्रामस्थांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे सी वर्ल्ड प्रकल्पाला असलेली विरोधाची धार नक्कीच कमी झाली असेल. दुसरीकडे ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबतीतही आता दोन प्रवाह आहेत. प्रकल्प विरोधी प्रवाहाचे ठाकरे शिवसेनेने नेहमी नेतृत्व केले. खासदार विनायक राऊत यांनी नेहमीच पर्यावरण हानिकारक म्हणत ग्रीन रिफायनरी प्रकल्पविरोधी भूमिका घेतली मात्र स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नाकडे राऊत लक्ष देण्यात अपयशी ठरले. भाजपाचे कायमच ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला समर्थन राहिले आहे.आता खासदार पदी निवडून आलेले नारायण राणे हे नक्कीच ग्रीन रिफायनरी अस्तित्वात येण्यासाठी मार्ग काढतील हेही साहजिक आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे लाखो हातांना रोजगार मिळेल हे नाकारून चालणार नाही. हे होणार नाही, ते जमणार नाही, अशी कारणे देत विकासाला बगल देण्यापेक्षा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रखडलेले विकासप्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि नवीन प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातून हक्काने आणण्यासाठी त्या ताकदीचा वजनदार नेता आजवर तळकोकणला मिळाला नव्हता. आज देशात पंतप्रधान मोदींचे तिसऱ्यांदा सरकार अस्तित्वात येत असताना तळकोकणात नारायण राणेंच्या रुपात महायुती चा सत्ताधारी खासदार निवडून आला आहे. साहजिकच याचा परिणाम तळकोकण विकासासाठी सत्ताधारी खासदाराला निधी देताना केंद्र सरकारही हातचे राखून ठेवणार नाही हे नक्की. राजकीय दृष्ट्या होणाऱ्या बदलांकडे पाहिले तर तळकोकणात आता यापुढील सर्वच सार्वत्रिक राजकीय निवडणुकांत भाजपा हा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष ठरणार हे सरळ आहे. दुसरीकडे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती असल्यास महायुतीचेच आणि महायुती नसल्यास भाजपाचे वर्चस्व असेल हेही नक्की. कारण ..राणे है तो मुनकीन है ! राज्यात 2 वर्षापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीत शिवसेना दुभंगली. नंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. याचा परिणाम कोकणात झाला.शिवसेनेची असलेली ताकद कमी झाली. आणि सेनेच्या मदतीला असणारी राष्ट्रवादी सुद्धा बीजेपी च्या साथीला गेली. साहजिकच कोकणात भाजपाचे पारडे जड झाले आणि त्याचा नेमका फायदा उचलत महायुती मधून भाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ कमळ निशाणीवर लढवला.कमळ निशाणीच्या पदरात तळकोकणचा हा मतदारसंघ पाडून घेण्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांचा कडवा आग्रह कारणीभूत ठरला. महायुती च्या सर्वपक्षीयांनी लोकसभा निवडणूक एकजुटीने लढवली आणि राणेंनी विजय मिळवला. नारायण राणे यांनी 48 हजारांचे लीड घेत लोकसभेचे मैदान मारले असले तरी प्रत्यक्षात राणेंनी 2019 च्या तुलनेत शिवसेनेपेक्षा 2 लाख 23 हजार हुन अधिक मते जास्त मिळवली आहेत याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 2019 मध्ये माजी खासदार विनायक राऊत यांचे 1 लाख 74 हजारांचे लीड होते. नारायण राणेंची उमेदवारी जरी उशिरा जाहीर झाली असली तरी त्याआधीपासून भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली होती. विशेषतः दीपक केसरकर यांनी कोकण विकासाच्या हितासाठी नारायण राणे उमेदवार असणे गरजेचे आहे अशी सडेतोड आणि जाहीरपणे भूमिका घेत राणेंच्या उमेदवारीचे समर्थन केले. लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातील आकडेवारी सांगते की सर्वाधिक लीड हे आ.नितेश राणे यांनी कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात तर दुसऱ्या क्रमांकाचे लीड मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दिले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे लीड कुडाळ मालवण मधून निलेश राणे दत्ता सामंत यांनी मिळवून दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख पेक्षा जास्त लीड हे नारायण राणेंना मिळाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात भले विनायक राऊत महायुती पेक्षा आघाडीवर असले तरीही 2019 मध्ये विनायक राऊत याना राजापूर, रत्नागिरी चिपळूण मतदारसंघात असलेले लीड 2024 मध्ये घटले आहे हे विशेष आहे. एकंदरीत 2014 नंतर तब्बल एका दशकाने तळकोकणात पुन्हा एकदा राणेपर्व सुरू झाले आहे.