प्रत्येक नागरिकाची नोंदणी होण्यासाठी नियोजन करा
“नो कार्ड.. नो रेशन” सारखे उपक्रम राबवा
लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे, अशा सूचना आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी केल्या. यासाठी शिबिरांचे आयोजन करावे, तसेच “नो कार्ड.. नो रेशन” हा उपक्रम राबवा, असेही त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत/ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक डॉ. शेटे व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक किरण कुंडलकर व जिल्हा समन्वयक रोहित खोलकुंबे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी व खासगी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. शेटे म्हणाले, आयुष्मान भारत योजनेतून नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. येत्या काळात देशातील सर्व घटकांना अधिक चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. यात केशरी, पिवळ्या व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना कॅशलेस पद्धतीने आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाची नोंदणी होऊन प्रत्येकाचे कार्ड असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शिबिरांचे आयोजन करावे. तसेच “नो कार्ड नो रेशन” उपक्रम प्रभावीपणे राबवून एकही नागरिक या कार्ड पासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. रुग्ण आणि रुग्णालये या दोन्ही घटकांचे हित पाहून आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती काम करत आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, समन्वयक, शासकीय व खाजगी रुग्णालयांनी देखील नियोजनबद्ध प्रयत्न करुन या योजनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून द्यावा. उद्दिष्टापेक्षा कमी लाभ देणाऱ्या हॉस्पिटलना या योजनेतून अपात्र करण्याची कार्यवाही करा, असे निर्देश देवून जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्णालयांनी या योजनेत समाविष्ट होण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, सध्या जिल्ह्यातील 56 खाजगी व 9 शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत /महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. यात 1309 आजारांचे उपचार व औषधे मोफत दिली जात आहेत. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी नियोजनबध्द प्रयत्न सुरु आहेत. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी इच्छुक खासगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींनी समितीकडे प्रस्ताव सादर केले.