जेष्ठ विधिज्ञ उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : पती बारहेगावी गेल्याचा गैरफायदा घेत नातेवाईक असलेल्या युवकाने रात्री घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपातून वैभववाडी तालुक्यातील मांगवली येथील अमर भास्कर संसारे याची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
जानेवारी २०१७ मध्ये पती मुंबईला गेले असल्याची फिर्यादी महिला घरात एकटीच घरी असल्याची माहिती घेऊन रात्री ८ वा.च्या सुमारास आरोपीने फिर्यादीच्या घरात बेकायदा प्रवेश केला व लाईट बंद केला. तसेच तीच्याशी गैरवर्तन सुरू केले. यावेळी झालेल्या आरडाओरडीत शेजारी ईसम घरामध्ये आला त्यावेळी आरोपी पळून गेला. याबाबत पती मुंबईहून आल्यानंतर फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध भादंवि कलम ४५२, ३५४ अ नुसार गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली होती.
सुनावणीदरम्यान, पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती तसेच कोणताही विश्वासार्ह पुरावा पुढे न आल्याने आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.