नो मायनिंग ! आजगाव मधील सर्वेस उबाठा सेनेचा विरोध – रुपेश राऊळ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शेतकरी व ग्रामस्थांना कोणतीही कल्पना न देता आजगावमध्ये मायनिंग कंपनीकडून सर्वे केला जाणार आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला देखील पत्र प्राप्त झाल असून त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा सर्वे आम्ही होऊ देणार नाही. त्या ठिकाणी जाऊन आम्ही तो सर्वे हाणून पाडू असा इशारा उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे दिला. दरम्यान मायनिंग सारखा पर्यावरणाला घातक असण्यासारखे प्रकल्प इथे आणण्याचा घाट हे सत्ताधारी करत असल्याचा आरोप राऊळ यांनी यावेळी केला आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकल्प आणून फंड गोळा करण्याचं काम सत्ताधारी करत नाही ना ? असा सवाल ही राऊळ यांनी यावेळी उपस्थित केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, 2022 मध्ये मायनिंग प्रकल्पाचा विषय संपला असताना आता पुन्हा एकदा हा प्रकल्प आणण्याचा काम प्रशासन का करत आहे. एकजुटीने सर्व ग्रामस्थांनी विरोध केला असताना आता हा प्रकल्प पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने पुनर्जीवित केला जात आहे ? असा सवाल ही राऊळ यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, पडद्या मागच्या सूत्रदाराने एखादा स्थानिकांना रोजगार देणारा प्रकल्प आणला असता तर खऱ्या अर्थाने एक प्रकारे न्याय देण्याचं काम त्यांच्या हातून झालं असतं. परंतु ते न करता आजगाव पंचक्रोशी उध्वस्त करणारा प्रकल्प आणला जात असल्याने उद्धव ठाकरे सेनेच्यावतीने याला पूर्णपणे विरोध असणार असा इशारा ही राऊळ यांनी यावेळी दिला. तसेच लवकरच या मागचा सूत्रधार देखील आम्ही जनतेसमोर आणू असा इशारा राऊळ यांनी यावेळी दिला आहे. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, तिरोडा प्रभारी सरपंच संदेश केरकर, सुनील गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!