आरोपी हृदय मेस्त्री याला न्यायालयाचा दणका
सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : गृहकर्ज वेळेत न फेडल्यामुळे तारण घर कायदेशीर रित्या बँकेने ताब्यात घेतल्यानंतर सदर घरात अनधिकृत प्रवेश केल्याबद्दल आरोपी हृदय तुकाराम मेस्त्री ( रा. स्वप्ननगरी चराठा ) याचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला. याबाबतची फिर्याद बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी चे सिनिअर मॅनेजर शरद पेडामकर यांनी दाखल केली होती.आरोपी हृदय मेस्त्री यांनी 20 सप्टेंबर 2014 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा सावंतवाडी कडून 18 लाख 50 हजार गृहकर्ज घेतले होते. गृहकर्जाची वेळेत परतफेड न केल्यामुळे चराठे गावातील सदर तारण मालमत्ता घर क्र. 1049 वर बँक ऑफ इंडिया ने 16 एप्रिल 2024 रोजी कायदेशीर ताबा घेतला होता.सदर मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकसुद्धा बँकेने नेमला होता. 30 एप्रिल रोजी आरोपी हृदय मेस्त्री याने सुरक्षा रक्षकाला दमदाटी करून बँकेच्या ताब्यात असलेल्या घराचे कुलूप तोडून अनधिकृतपणे प्रवेश केला. याबाबत आरोपीविरोधात सी आर नं 84 /2024 नुसार गुन्हा दाखल आहे.सदर घराचा लिलाव होणार हे समजल्यानंतर आरोपी हृदय मेस्त्री याने आपल्या पत्नीसह पुन्हा बँकेच्या ताब्यात असलेल्या घरात प्रवेश केला. याबाबतआरोपी हृदय मेस्त्री व तुळशी हृदय मेस्त्री या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात आरोपी हृदय मेस्त्री याने दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जास सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्द्यांद्वारे हरकत घेतली.आरोपी हृदय मेस्त्री व त्याच्या पत्नीने गंभीर गुन्हा केला आहे. बँकेच्या ताब्यात असलेल्या प्रॉपर्टी मध्ये बेकायदेशीर प्रवेश करण्याचा गुन्हा सलग दोन वेळा केला आहे.आरोपीने तपास पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या नोटीसीचा भंग केला आहे. बँकेने लावलेले कुलूप आणि लोखंडी साखळ्या तोडण्यासाठी वापरलेला हातोडा जप्त करायचा आहे. तारण मालमत्तेचा लिलाव करायचा असून आरोपीला जामीन मिळाल्यास तो खरेदीदारावर दबाव आणण्याची शक्यता आहे. आरोपीला कायद्याचे भय नाही. आदी मुद्दे मांडत सरकारी वकील देसाई यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठी युक्तिवाद केला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेल्या युक्तिवादानंतर आरोपी हृदय मेस्त्री याचा अटकपूर्व जामीन अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळला.












