सावंतवाडी (प्रतिनिधी) : सातार्डामार्गे मळेवाडच्या दिशेन येत असताना साटेली आरोस दरम्यानच्या अवघड वळणावर चिरे वाहतुक करणाऱ्या डंपरने हूल दिल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने कार पलटी झाली. यात हुंडाई ईऑन (एम एच ०७ क्यू ६४१६) कारचे मोठे नुकसान झाले तर कारचे मालक डॉ. सौरभ पाटील (२९ रा. रेडी म्हारतळेवाडी) हे सुदैवाने बालंबाल बचावले.
सदर रस्त्यावरून बेकायदेशीरपणे चिरे वाहतुक होत असून या अवघड वळणावर चिरे वाहतूक करणाऱ्यांनी एखादा गार्ड नेमणे गरजेचे आहे. तसे नसल्याने अचानक याठिकाणी समोरुन वाहने येत असल्याने अपघात होत आहेत. भविष्यात एखाद्या अपघातात बळी जाण्याची वाट प्रशासन पाहत आहे का असा संतप्त सवाल यावेळी डॉ. पाटील यांनी केला. तसेच या सर्व बेकायदेशीर प्रकाराला प्रशासन जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले.