युट्यूब चॅनलवर प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची धडपड
शिक्षण विभागाच्या कारवाईकडे पालक व शिक्षक वर्गाचे लक्ष
वैभववाडी (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने ‘STARS’ प्रकल्पांतर्गत इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, गणित व इं ग्रजी या विषयांसाठी दरवर्षी संकलित मुल्यमापन चाचणीचे आयोजन करण्यात येते. सहामाही परीक्षेच्या काळात असलेल्या या तिन विषयांचे परिक्षांचे गुण अनेक शाळा सहामाही तसेच वार्षिक परिक्षेच्या निकालात समाविष्ट करुन निकाल तयार करतात.
आज संपूर्ण राज्यात या परिक्षेस सुरवात झाली आहे. दि.२२ रोजी मराठी, दि.२३ रोजी इंग्रजी व दि.२४ रोजी गणित विषयांचे संकलित मुल्यमापन चाचणीचे आयोजन संपुर्ण राज्यात शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या परिक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच दोन दिवस आधीपासून Y.C. Education MH तसेच study with omkar या युट्यूब चॅनल वर प्रसारित होताना दिसत आहेत. त्यामुळे या परिक्षेत असलेली गोपनीयता धाब्यावर बसवलेली पहायला मिळत आहे. परिक्षेच्या काळात अभ्यास सोडून विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरांसह सहज उपलब्ध होत असणाऱ्या या प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी मोबाईल व युट्यूब वर सक्रिय झालेले पहायला मिळत आहेत. अशा पद्धतीने परिक्षांचे आयोजन करून शिक्षण विभागास नेमके काय साध्य करायचे आहे. ? असा प्रश्न आज सर्व पालक व शिक्षक वर्गातील पडलेला आहे. अशा पद्धतीने परिक्षांचे पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरांसह प्रसारित करणाऱ्या व्यक्ती, युट्यूब चॅनल वर शिक्षण विभाग काय कारवाई करणार याकडे पालक व शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.