सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात येत असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असून लोकसंख्या वाढीचा दर निगेटिव्ह आहे. जिल्ह्याचे निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ एवढे आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्या जात असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज जागतिक लोकसंख्या दिना निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
११ जुलै या जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या ,जागतिक सर्वाधिक लोकसंख्येत भारताचा प्रथम क्रमांक लागतो. लोकसंख्या वाढीची विविध कारणे आहेत .त्यामध्ये कमी वयात मुलींचे विवाह तसेच पुरुषप्रधान संस्कृतीमुळे व मुलगाच म्हातारपणाचा आधार या समजामुळे मुलगा होत नाही तोपर्यंत कुटुंबाची अमर्याद वाढ, हेही लोकसंख्या वाढीचे एक सामाजिक कारण आहे .लोकसंख्या वाढीचे अनेक दुष्परिणाम आहेत त्यामध्ये वाढती बेरोजगारी ,उपलब्ध संसाधनांवर ताण, सामाजिक असमतोल दिसून येतो .त्यासाठी शासनाकडून लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. छोटे कुटुंब संकल्पनेचा प्रचार व प्रसार, कुटुंब नियोजन साधनांची सहज उपलब्धता, कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, विवाहाच्या योग्य वयाबाबत जनजागृती, किशोरवयीन मुलींना लैंगिक शिक्षण, आदी उपाययोजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार केला असता समाधानकारक स्थिती आहे .सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. लोकसंख्येची घनता कमी आहे. जिल्ह्याचे १००० लोकसंख्येतील निव्वळ जन्म प्रमाण ७.७३ टक्के एवढे असून निवळ मृत्यू प्रमाण १२.५ तर अर्भक मृत्यू प्रमाण ९.३७ एवढे आहे.
जिल्ह्यातील जन्म प्रमाणात घट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याने लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश आले असून सन २०११ मध्ये निव्वळ जन्म प्रमाण ११.१, सन २०१२ मध्ये १०.६८, २०१३ मध्ये १०.०२, २०१४ मध्ये ९.९९, २०१५ मध्ये ९.०८, २०१६ मध्ये ९.०५, २०१७ मध्ये ९.०२, २०१८ मध्ये ८.९५, २०१९ मध्ये ८.७७, २०२० मध्ये ७.४४, २०२१ मध्ये ७.०४, २०२२ मध्ये ७.८८ तर २०२३ मध्ये ७.७३ एवढे जिल्ह्याचे जन्म प्रमाण आहे.
४०,८२६ जोडपी कुटुंब नियोजन शत्रक्रियेने संरक्षित
एप्रिल २०२४ मधील कुटुंब सर्वेनुसार जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातील एकूण जननक्षम जोडपी ८९ हजार ४५५ एवढी असून त्यापैकी ४० हजार,८२६ जोडपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेने संरक्षित झालेली आहेत तर १४ हजार,१३६ जोडपी तांबी, निरोध किंवा गर्भनिरोधक गोळ्याने संरक्षित आहेत. उर्वरित ३४हजार ४९३ जोडपी असरक्षित असून या जोडप्यांना संरक्षित करणे हे आरोग्य विभागासमोरील उद्दिष्ट आहे. अशी माहिती यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.
लोकसंख्या दिनानिमित्त २७ जून ते १० जुलै या कालावधीत दांपत्य संपर्क पंधरवडा राबविण्यात आला असून यावेळी कुटुंब नियोजन पद्धतीची व साधनांची माहिती देण्यात आली तर लोकसंख्या स्थिरता पंधरवडा ११ जुलै ते २४ जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे यामध्ये संतती प्रतिबंधक साधनांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती यावेळी डॉ सई धुरी यांनी दिली.