मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेसाठी २३ हजार ८८७ महिलांचे अर्ज दाखल

पात्र लाभार्थ्यांनी जास्त संख्येने अर्ज दाखल करावेत – जिल्हाधिकारी किशोर तावडे

ओरोस (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजनेसाठी जिल्ह्यात तीन लाख ३६ हजार महिला आहेत. यातील २३ हजार ८८७ महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत एकाच घरातील अनेक महिला व केवळ एकच अविवाहित महिला लाभ घेवू शकते, असे सांगत जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील महिलांना केले आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सभागृहात तावडे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी तुषार मठपती, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषद महिला बालकल्याण समन्वयक संतोष भोसले, कुडाळ मुख्याधिकारी तुषार मठपती, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी तावडे यांनी, या योजनेसाठी कमी कागद लागतात. तसेच लागणारे कागद सहज उपलब्ध होणारे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र सर्वच महिलांना याचा लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे आपण तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या बैठका घेवून सूचना केलेल्या आहेत. अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत ही योजना राबविली जात आहे. या सेविका घरोघरी जावून सर्व्हेक्षण करीत आहेत. अर्ज भरून घेत आहेत. त्याला पात्र महिलांना सहकार्य करावे, असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्ह्यात एकूण २ लाख ३३ हजार ७११ कुटुंब संख्या आहे. यातील ७५ हजार १५१ कुटुंबांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्व्हेक्षणानुसर ६१ हजार ४८४ पात्र लाभार्थी मिळाले आहेत. २० हजार ६५४ जणांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. ३ हजार २३३ जणांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरले आहेत. प्रचार प्रसिध्दी साठी आतापर्यंत एक हजार ८७४ बैठका घेण्यात आल्या आहेत. शासनाच्या कोणत्याही योजनेतून महिन्याला दीड हजार रुपये लाभ घेणारी महिला याचा लाभ घेवू शकणार नाही. नारी शक्ती दुत हा ॲप डाऊनलोड करून पात्र महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात, असे यावेळी जिल्हाधिकारी तावडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!