लेप्टो स्पयरोसिस व जलजन्य साथीचे आजार यामुळे जिल्ह्यातील ३३ गावे जोखिमग्रस्त

आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लेप्टो स्पयरोसिस व जलजन्य साथीचे आजार या कारणामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ३३ गावे जोखिमग्रस्त म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये आरोग्य विभागाचा विशेष लक्ष असणार आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ धुरी म्हणाल्या, सध्या जिल्ह्यात कोणतीही साथ नाही, परंतु भविष्यात येऊ शकते म्हणून आरोग्य विभाग सतर्क आहे. जून अखेर मलेरियाच्या ५० हजार ७५६ संशयित रुग्णांची तपासणी केली असता २८ रुग्ण पोझिटिव आढळले आहेत. सर्वाधिक ७ रुग्ण कणकवली मध्ये आढळले आहेत. त्यानंतर दोडामार्ग मध्ये एकच ठिकाणी ६ रुग्ण आढळले होते, सावंतवाडी मध्ये ३, वेंगुर्ला १, कुडाळ २, मालवण ५, देवगड ३, वैभववाडी १ रुग्ण आढळला आहे. डेंग्यूच्या ४५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ८ रुग्ण पोझिटिव आढळले होते. दोडामार्ग,कणकवली, सावंतवाडी मध्ये प्रत्येकी २ रुग्ण तर कुडाळ व मालवण येथे प्रत्येकी १ रुग्ण सापडला होता. माकड तापाच्या २३० संशयित रुग्णांची तपासणी केली होती सुदैवाने यात सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. चिकुनगुनिया च्या संशयित १०४ रुग्णांची तपासणी सुद्धा निगेटिव्ह आली आहे.

डॉ धुरी म्हणाल्या, जिल्ह्यात सध्या कोणत्याही तापाची साथ नाहीय. परंतु सध्याचा काळ हा जलजन्य साथीच्या आजारांचा आहे. त्यामुळे घराशेजारी पाणी साचू देऊ नका, दर मंगळवारी घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ धुवून वाळत ठेवली पाहिजे.हा दिवस कोरडा दिवस पाळावा, जेणेकरून डासांच्या अळ्या होणार नाहीत. जिल्ह्यात सध्या लेप्टो चे रुग्ण नाहीत. परंतु आमची यंत्रणा ॲक्टिव मोडवर आहे. गेल्या ३ वर्षात लेप्टो व जलजन्य साथीचे आजार ज्या गावात उद्भवले होते, अशी गावे निश्चित करून त्या गावात विशेष लक्ष दिले जात आहेत. १ जुलै पासून दर आठवड्यातून एकदा शेतकरी, कामगार, मच्छिमार, गटारी कामगार, चालक, गवंडी यांना डोक्सी च्या कॅप्सुल देण्यात आल्या आहेत. जेणेकरून लेप्टो च्या साथिला रोखण्यास मदत होईल. जिल्ह्यात एकही “झिका “चा रुग्ण नसल्याचेही त्या म्हणाल्या.

जोखिमग्रास्त ३३ गावे

वैभववाडी तालुक्यातील नापणे, कणकवली तालुका फोंडा, घोनसरी, बोर्डवे, हरकुळ बुद्रुक, तरंदळे, साकेडी, डाबरे, वाघेरी, कासार्डे, मालवण मध्ये पळसम, कुडाळ तालुक्यात मोरगांव, पावशी मिटक्याचीवाडी, पोखरण, धुरीटेंबनगर, गोवूळवाडी, पाग्रड, कडावल, टेंभगाव, वेंगुर्ला तालुक्यामध्ये वेतोरे, सावंतवाडी मध्ये पाडलोस, सातोसे, बांदा हॉस्पिटलकट्टा, शेरले, मळेवाड, दोडामार्ग तालुक्यात पाळये,पिकुळे, हेवाळे, हेवाळे गावठाण, केर, मांगेली, साटेली भेडशी, कुंब्रल यांचा समावेश आहे.

मेडिकल कँप घेणार..
जिल्ह्यात झालेल्या पूरस्थिती मुळे विहिरींमध्ये पाणी जाऊन विहिरी दूषित बनल्या आहेत. अशा विहिरींमध्ये सुपर कलोरीन घालून पाणी पिण्यायोग्य करणार आहे. तर ज्या ठीकणी पूरस्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत, जेणेकरून साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही अशी माहिती डॉ सई धुरी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!