नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणूकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उदभवत नाही. माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो. आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःताचे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भाजप व आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो.