मसुरे देऊळवाडा शाळेत “ओळख रानभाज्यांची” उपक्रम संपन्न


मसूरे (प्रतिनिधी) : रान रानभाज्यांची ओळख व्हावी आणि त्यामध्ये उपलब्ध असणारे पोषक तत्वे यांची माहिती व्हावी त्याचप्रमाणे स्काऊट गाईड अंतर्गत ‘खरी कमाई’ चा आनंद विद्यार्थ्यांनी घ्यावा यासाठी मसुरे देऊळवाडा शाळेत ‘ओळख करून घेऊया’ आपल्या रानभाज्यांची हा उपक्रम राबवण्यात आला. आपला कोकण जैवविविधतेने नटलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसात सुरुवातीचे काही दिवस जंगलामध्ये वेगवेगळ्या भाज्या उगवतात. त्यांच्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषकद्रव्ये असतात.

शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या भाज्या उगवतात. त्यामुळे या वनस्पतींमध्ये खनिजे, महत्त्वाची मूलद्रव्ये व अत्यंत उपयोगी पोषक घटक आढळतात.

दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक रानभाज्या येथे उगवतात. कोणत्याही लागवडीशिवाय, रासायनिक खतांशिवाय व किटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या अशा रानभाज्या आरोग्यवर्धक व सुरक्षित आहेत. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने खाल्ल्या जातात.

पुर्वी पावसाळ्याचे दिवस कोकणातील माणसांसाठी अतिशय कसोटीचे दिवस असत. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे.

प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध रानभाज्या जमा केल्या होत्या. त्यांची पोषकतेसंदर्भातील माहिती दिली. पालक व ग्रामस्थांनी या प्रदर्शनास भेट देऊन भाजी खरेदी केली. या उपक्रमाचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदानंद कबरे, उपाध्यक्षा दिपिका लाकम, भाऊ भोगले, मुख्याध्यापक प्रशांत पारकर, पालक व ग्रामस्थांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!