पालकमंत्र्यांच्या खात्याचे अधिकारी व ठेकेदार पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याचे सिद्ध
जुन्या पुलावरून पाणी गेल्याने आज पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी पालकमंत्र्यांना धरले जबाबदार
कुडाळ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन भूमिपूजन केलेल्या कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील दुकानवाड पुलाच्या कामाची वर्कऑर्डर अद्याप पर्यंत झालेली नाही. भूमिपूजनाला ५ महिने होऊन देखील ठेकेदाराने या कामाची वर्कऑर्डर घेतलेली नाही. पालकमंत्र्यांचा वचक नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या कामाबाबत तत्परता दाखवलेली नाही. पालकमंत्र्यांच्या खात्याचे अधिकारी व ठेकेदार पालकमंत्र्यांना जुमानत नसल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुलाच्या कामाचे भूमिपूजन करून पालकमंत्र्यांनी जनतेची फसवणूक केली आहे. सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसात दुकानवाड येथील जुना पूल वारंवार पाण्याखाली जात असून अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. याला सर्वस्वी पालकमंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याची टिका शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या मागणीवरून आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील दुकानवाड पूलासाठी बजेट मध्ये ४ कोटी ५० लाख रु निधी मंजूर केला होता. मात्र त्यानंतर सत्तांतर झाल्यानंतर या कामाला शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली होती. मात्र कोर्टाच्या आदेशाने स्थगिती उठल्याने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते मिळविण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या पुलाचे ८ मार्च रोजी ऑनलाईन भूमिपूजन करून श्रेय घेतले.कामाचे श्रेय घेण्यासाठी जशी धडपड केली तशीच धडपड काम पूर्ण करण्यासाठी का केली नाही? पावसाळ्यात दुकानवाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी पुलाच्या कामाला सुरुवात करणे गरजेचे होते परंतु भूमिपूजन होऊन ५ महिने झाले तरी अद्याप ठेकेदाराने वर्कऑर्डर घेतलेली नाही.ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे अधिकारी काम करत आहेत. पालकमंत्र्यांना ते जुमानत नाहीत त्यामुळे आता पावसाळयात दुकानवाडच्या जुन्या पुलावरून सातत्याने पाणी जात असून अनेक गावांचा संपर्क तुटत आहे. आज देखील पुलावर पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतांसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनतेची फसवणूक केली असली तरी येथील जनता विधानसभा निवडणुकीत याचा बदला घेणार असल्याचे संजय पडते यांनी सांगितले.