ब्यूरो न्यूज (मुंबई) : भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा पोलिसाना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. ‘पोलिसांनो अशा जिल्ह्यात बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर अकोल्यातील पोलीस बॉय संघटने निषेध व्यक्त केला आहे. अकोल्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असताना त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवण्यात आले. पलूस शहरामध्ये लव जिहाद विरोधात खासदार अमर साबळे,आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधत,पोलीस ठाण्यात लव्ह जिहाद बाबत तक्रार देण्यात येणाऱ्या मुलीची तक्रार अर्धा तासात घेतली पाहिजे,अन्यथा पुढच्या तीन तासात पोलीस ठाण्यात आपण स्वतः दाखल होऊन,गोंधळ घालू असा इशारा देखील नितेश राणे यांनी दिला आहे.
पोलीस विभागीतील काही पोलीस अधिकारी हिंदू समाजाच्या लव्ह जिहादाचा विषय आल्यास लवकर केस दाखल करत नाहीत, मुलीच्या पालकांबरोबर गैरव्यवहार करतात, अशा पोलिसांमुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होतं, अशा सडक्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा देतो, असं नितेश राणे यांनी म्हटलंय. राज्यात हिंदुत्ववादी सरकार असून हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू दिसले तर अशा जिल्ह्यात बदली करु, बायकोचाही फोन लागणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. हिंदू मुलगी आणि तिच्या वडिलांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दिसले तर त्याच्या दुप्पट अश्रू तुमच्या डोळ्यातू काढू याची गॅरंटी देतो, अशी धमकीही नितेश राणे यांनी दिली आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले असून विविध प्रतक्रिया उमटू लागल्या आहेत. पण आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. आपण सर्वच पोलिसांना बोललो नाही, काही पोलीस अधिकारी लव्ह जिहाद आणि लॅँड जिहादवाल्यांना मदत करता, अशा पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही सोडणार नसल्याचं नितेश राणे यांनी सांगितलं.