स्मशानशेड, स्मशानभूमी रस्त्यासाठी घोणसरीतील 4 वाड्यांतील ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील घोणसरी गावातील सुतारवाडी, आयरेवाडी, सापतेवाडी, टेंबवाडी तील शेकडो ग्रामस्थ स्मशानशेड आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी उद्या 15 ऑगस्ट रोजी देवघर धरणाजवळ उपोषण करणार आहेत. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार नितेश राणे, कणकवली तहसीलदार, तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक कणकवली, कार्यकारी अभियंता मध्यम पटबंधारे प्रकल्प आंबडपाल यांना दिले आहे. देवघर धरणाच्या कालव्याच्या लगत घोणसरी गावातील

सुतारवाडी, आयरेवाडी, सापतेवाडी, टेंबवाडी आणि रावाचीवाडी या सर्व वाड्यांतील ग्रामस्थांची सापतेवाडी येथे असलेली स्मशानभूमीची जागा देवघर धरणाच्या संपादित क्षेत्रात गेली. त्यामुळे वरील वाडीतील मयत ग्रामस्थांचे अंत्यविधी खाजगी क्षेत्रातील जमिनीत केले जातात. या स्मशानभूमीमध्ये स्मशानशेड नाही आहे. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचणी येतात. मृतदेहावर अंत्यविधी करणे गैरसोयीचे आहे. सध्याच्या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा देवघर धरण कालव्याच्यालगत जातो. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या रस्त्याला मोठे चर पडले आहेत. त्यामुळे या रस्तावर कोणतेच वाहन चालविणे अशक्य आहे. अंत्यविधी वेळी सुद्धा या रस्त्यावरून चालत जाणेही कठीण झाले आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करावे अशीही मागणी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थ महेश येंडे, सचिन सुतार, श्रीराम बुकम, गणेश मराठे विनय बुकम, भास्कर साळवी आदींसह शेकडो ग्रामस्थ स्मशानशेड आणि स्मशानभूमी रस्त्या साठी उपोषण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!