बाप्पाचे आगमन अन् रंगशाळेतील लगबग
संततधार पाऊस, तरीही प्रचंड उत्साह
चाकरमानी मुक्कामी अन् बाजारपेठ फुलली
रस्ते, वीज ,कोंडी असुविधा अन् डोंब महागाईचा…
ग्राहकांच्या प्रतीक्षेत व्यापारी, सारेच आलबेल
फोंडाघाट (प्रतिनिधी) : गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर दोन दिवसापासूनच चाकरमान्यांचे जथे फोंडाघाट बाजारपेठेमध्ये अवतरू लागले आहेत. त्यामुळे बाजारपेठेमध्ये, एसटी स्टँड वर गर्दी दिसून येत आहे, अशावेळी पारंपारिक उतारपेठ असलेली फोंडाघाट बाजारपेठ विविध वस्तू, किराणा दुकाने ओसंडत आहेत. विविध प्रकारची तोरणे, वेगवेगळ्या हार, फटाक्याची दुकाने, कापड, मंडपी चे साहित्य, लाईट डेकोरेशन, फळफळावळ, भाजीपाल्याची सजवलेली दुकाने, भांडी आणि गारमेंट दुकाने ग्राहकांना आकर्षित करून घेत आहेत. मात्र प्रचंड पाऊस आणि रस्त्यावरील खड्डे- खंडित वीज – ट्राफिकची कोंडी, पोलिसांच्या शिट्ट्या आणि या साऱ्यावर हौशा नवश्या ची बाजारपेठेतील गर्दी गणेशोत्सव काही तासावर आल्याचा उत्साह स्पष्ट करीत आहे. महागाईचा डोंब आणि मुंबईहूनच खरेदी करून गावी येणारे चाकरमानी, यामुळे बाजारपेठेमध्ये गर्दी असूनही व्यापाऱ्यांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे. मात्र यामध्ये शेवटच्या दोन दिवशी अपेक्षेत बदल दिसून येईल असा विश्वास व्यक्त होताना दिसत आहे….