कृषी संशोधन केंद्र – फोंडाघाट, कडून मारुतीवाडी – झर्येवाडी येथे वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
लगतच्या शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कृषी संशोधन केंद्र- फोंडाघाट, आणि ग्रामपंचायत- फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने, जलसंधारण अभियान २०२४ अंतर्गत फोंडाघाट येथील उगवाई नदीवर, मारुती वाडी आणि झर्येवाडी या दोन ठिकाणी दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सदर बंधारे माती- वाळू- दगड आणि मातीने भरलेल्या सिमेंट पिशव्यांचा थरावर-थर रचून माती भरून बांधण्यात आले. नदीवरील बंधाऱ्यांची बांधणी केल्यामुळे नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी अडविण्यात येणार असल्याने,आजूबाजूच्या विहिरीतील जलपातळीत लक्षणीय वाढ होऊन, लगतच्या शेतकऱ्यांना पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीसाठी सदर पाण्याचा उपयोग होईल.
बंधाऱ्याचे उद्घाटन सरपंच सौ. संजना आग्रे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. सदर उपक्रमात कृषी संशोधन केंद्र फोंडाघाटचे कर्मचारी, अधिकारी, मजूर वर्ग तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य – कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी सहभाग घेऊन श्रमदान केले. कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर व्ही एन शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारणाचा हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. याचे परिसरात कौतुक होत आहे.