एकाच घरात ; एका मंचकावर आणि एकाच माटवीखाली तब्बल तीन गणेशमुर्तींचे पूजन

काळसेतील केळुसकर कुटुंबीय गुण्यागोविंदाने जपतायत सुमारे २०० वर्षांची आगळीवेगळी परंपरा

चौके (अमोल गोसावी) : कोकणात गणेशोत्सव म्हटल की आनंद, चैतन्य, उत्साह, श्रद्धा आणि भक्तीभाव घराघरात अनुभवायला मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश घरांमध्ये गणेशमुर्तीचे गुण्यागोविंदाने आणि भक्तिभावनेने पूजन केले जाते. यामध्येच काही घरांमध्ये अनेक पिढ्यांपासून चालत आलेल्या आगळ्यावेगळ्या परंपराही जोपासल्या जातात. अशाचप्रकारे मालवण तालुक्यातील काळसे वरचावाडा येथील केळुसकर कुटुंबीयही गणेशोत्सवाची आगळी वेगळी परंपरा जोपासत आहेत. सर्वसामान्यपणे प्रत्येक घरामध्ये एक गणेशमूर्ती आणून तिची मनोभावे सेवा केली जाते परंतु काळसे गावातील केळुसकर कुटुंबीयांच सामाईक घर याला अपवाद असून या एकाच घरात एकाच मंचकावर आणि एकाच माटवीखाली तब्बल ३ गणेशमुर्तींच एकाच वेळी पूजन केल जात. याबरोबरच नागपंचमी दिवशी सुद्धा या घरात एकाच वेळी तीन नागोबांच पूजन केल जात ही खरोखरच वेगळी परंपरा आहे. असे असले तरी या घराची गुढी मात्र एकच आहे. आणि सर्व कुटुंबीयांचे मुळ देवघर ही एकच आहे.

सध्या केळुसकर यांच जवळपास ९० सदस्यांच कुटुंब आहे. त्यामध्ये १५ कुटुंबप्रमुख आहेत. ३०० वर्षांपुर्वी बांधलेल्या घरात सर्वजण गुण्यागोविंदाने सर्व सण साजरे करतात. एकाच माटवीखाली तीन गणेशमुर्ती पूजनाच्या परंपरेविषयी माहिती देताना श्री. जयवंत केळुसकर यांनी सांगितले कि हि परंपरा सुमारे २०० वर्षांपुर्वी सुरु झाली असावी कारण आमची चौथी पिढी ही परंपरा जोपासत आहोत. आता प्रदिप महादेव केळुसकर , जयवंत नारायण केळुसकर , प्रकाश परशुराम केळुसकर , राघो शिवाजी केळुसकर , सुधीर महादेव केळुसकर , किशोर महादेव केळुसकर , राजेंद्र बाबू केळुसकर , निलेश बापू केळुसकर एवढे जण कुटुंब प्रमुख आपापल्या कुटुंबासमवेत यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित आहेत.

आमचे पुर्वज तंबाखूच्या व्यापाराच्या निमित्ताने कराची येथे रहायचे पण त्यावेळीही ते गणेश चतुर्थीच्या निमित्ताने काळसे गावात यायचे , कालांतराने भारत – पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही पूर्वज कराचीतून इकडे येउन राहिले तर काहीजण तिकडेच थांबले. त्यानंतर १९६७- ६८ च्या दरम्यान सर्वजण कराची सोडून काळसे येथे आपल्या गावी स्थायिक झाले. त्यावेळी घरात एकच गणेशमुर्ती पूजन व्हायची . त्या काळातील ४ भाऊ एकत्र येउन गणेशोत्सव साजरा करायचे. परंतु एकदा व्यापारानिमित्त बाहेर असलेले भाऊ घरी येण्याची वाट न पाहता त्यातीलच इथे स्थायिक असलेल्या भावाने एकट्यानेच गणेशमूर्तीची पूजा केली. याच गोष्टीचा राग धरून पुढील वर्षीपासुन ईतर भावांनीही स्वतः वेगळी गणेशमूर्ती आणून त्याच मंचकावर पूजन केले आणि तेव्हापासून आमच्या घरात एकाच माटवीखाली एकापेक्षा जास्त गणेशमूर्ती पूजन करण्याची प्रथा पडली. अशी माहिती जयवंत केळुसकर यांनी दिली.

एकाच माटवीखाली तीन गणेशमूर्तींच्याबद्दल माहिती घेत असताना घरातील एक सदस्य श्री. प्रदीप केळुसकर यांनी आणखी एक अनोखी माहिती दिली ती म्हणजे सुमारे १०० वर्षांपुर्वी याच ठिकाणी ५ गणेशमुर्तींचे पूजन केले जायचे आणि नागोबाही ५ पुजले जायचे. पण काही कारणास्तव कौटुंबिक वाद होऊन दोन भावांनी आपली स्वतंत्र घरे बांधली आणि आपले गणपती तिकडे गेले त्यानंतर तीन गणपती राहिले ते आतापर्यंत तीन गणपतींचे पूजन सर्व कुटुंबीय सातत्याने करत आहेत. पुर्वी श्रावणाच्या सुरुवातीला एक ब्राम्हण कुटुंब आमच्या घरी यायचे आणि महिनाभर पूजा अर्चा करायचे. गणेशोत्सवापुर्वी श्रावण महिन्यात दरवर्षी घरात होम करून शुद्धीकरण विधी केला जातो . तसेच गणेशचतुर्थी दिवशी पहिले भजन या गणपतीसमोर केले जाते त्यानंतर वाडीतील इतर गणपतींची भजने केली जातात. आमच्या कुटूंबातील अनेक सदस्य नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला राहतात पण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बहुतेकजण सर्वजण दरवर्षी गावी येतात. प्रत्येक कुटुंब वेगवेगळे जेवण बनवतात आणि नैवेद्य मात्र एकत्रच दाखवला जातो. त्यामुळे जेवणात अनेक पदार्थांचा समावेश असतो.
अशाप्रकारे चार पिढ्यांपासून आणि सुमारे २०० वर्षांपासून चालत आलेली एकाच माटवीखाली सुरुवातीला पाच आणि नंतर तीन गणेशमूर्ती पूजनाची परंपरा जोपासत आहेत. आणखी एक विशेष म्हणजे दरवर्षी सात दिवस गणपती पुजले जातात आणि गौरी गणपती विसर्जन एकदमच सातव्या दिवशी केले जाते. यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. अशी माहिती केळुसकर कुटुंबीयांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!