वैभववाडी (प्रतिनिधी) : छत्रपती शिवारायांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याची स्वच्छता मोहिमेत वैभववाडी येथील महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.
छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश आणि त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याच्या अनुषंगाने युनेस्कोचे पथक ऑक्टोबर महिन्यात या किल्यांना भेट देणार आहे.महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन, पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेने जिल्ह्यातील समविचारी संस्थां, शाळा, महाविद्यालये, तरुण मंडळे, शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व ग्रामस्थ यांना स्वच्छता कार्यक्रमाचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता कार्यक्रम संपन्न झाला. विजयदुर्ग किल्ल्यावरील स्वच्छता कार्यक्रमात वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. इतिहास विभाग प्रमुख व सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचे सचिव प्रा.सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सलोनी पवार, श्वेता सावंत, मृदूला शिवगण व कोमल कदम हे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी व प्राचार्य यांनी अभिनंदन केले आहे.