साने गुरुजी सेवामयी कर्मचारी पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र आचरे शाखेचे प्रमुख रोखपाल महेश कोळंबकर यांना जाहीर

20 ऑक्टोबरला होणार पुरस्कार वितरण

आचरा (प्रतिनिधी) : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचा २०२४ यावर्षीचा सेवामयी कर्मचारी’ पुरस्कार बँक ऑफ महाराष्ट्र, आचरे शाखेचे कॅशियर महेश विष्णू कोळंबकर यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण २० ऑक्टोबर २०२४ रोजी मालवण तालुकास्तर कथा महोत्सवाच्या प्रसंगी सागर घनश्याम नाईक (झोनल मॅनेजर- बँक ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी झोन) यांच्या शुभहस्ते आणि सुरेश शामराव ठाकूर-गुरुजी (अध्यक्ष, साने गुरुजी कथामाला मालवण) यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी सदानंद कांबळी, प्रकाश पेडणेकर( ज्येष्ठ कथामाला कार्यकर्ते) तसेच माननीय सिलंबू अरुमुगम (शाखाधिकारी- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा आचरे), प्राध्यापक नागेश रघुनाथ कदम (सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर, मालवण) आणि कथामालेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, साने गुरुजी ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरूप असून पूज्य साने गुरुजी शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षातील हा पुरस्कार फार मोलाचा मानला जातो. या पुरस्काराचे वितरण पूजनीय प्रकाशभाई मोहाडीकर कथानगरी आचरे येथे होणार आहे, अशी माहिती पांडुरंग गुरुदास कोचरेकर (अध्यक्ष, निवड समिती सेवामयी पुरस्कार साने गुरुजी कथामाला) यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. त्यांचे अभिनंदन करताना सुरेश ठाकूर-गुरुजी (अध्यक्ष, कथामाला मालवण) म्हणाले, महेश कोळंबकर हे गेली १५ वर्षे बँक ऑफ महाराष्ट्र आचरे शाखेत निरलसपणे सेवा देत आहेत. यापूर्वी त्यांनी मालवण, गोवा, जामसंडे येथे अशीच प्रेममय ग्राहक सेवा दिली आहे. ३९ वर्षे सेवा करून पुढील वर्षी ते निवृत्त होत आहेत. बँकेत येणारा प्रत्येक ग्राहक हा आपला देव मानूनच ते त्याची सेवा करतात . कोरोना काळात आचरे पंचक्रोशीतील बँक ऑफ महाराष्ट्र, आचरे शाखेतील ग्राहकांना त्यांनी दिलेली सेवा खरोखरच कौतुकास पात्र आहे. “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” हे साने गुरुजींचे संस्कार ते आपल्या सेवेतून जपत आहेत. त्यांच्या निवडीमुळे पुरस्काराचे मोल वाढले आहे.
सुगंधा केदार गुरव (कार्यवाह- कथामाला मालवण), बाबाजी गोपाळ भिसळे (अध्यक्ष, रामेश्वर वाचन मंदिर आचरे) आदींनी महेश कोळंबकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!