ओरोस (प्रतिनिधी) : दोरीच्या साहाय्याने जन्मदात्या आईचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुरेंद्र मोहन कदम (वय ४०) रा. कसाल बौद्धवाडी यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए डी तिडके यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कसाल बौद्धवाडी येथील सुरेंद्र याने १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास बाजारात जाण्याच्या कारणावरून झालेल्या वादात आपल्या आई मनोरंजना कदम (वय ५८) यांना हाताच्या थापटाने जोरदार मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाच्या हातून सुटका करून घेण्यासाठी अंगणातून रस्त्याच्या दिशेने धावताना त्या अंगणातील गवताला अडकून पडल्या होत्या. त्यानंतर सुरेंद्र याने तेथे येत पुन्हा आईच्या कानाखाली जोरदार चापट मारली. तेथून पुन्हा त्या रस्त्याच्या दिशेने धावू लागल्या. त्या येथेच बाजूला असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ गेल्या असता संशयित आरोपी मुलगा सुरेंद्र याने तिला ढकलून आंब्याच्या झाडाजवळ पाडले. यानंतर सुरेंद्र याने आपल्या सोबत घरातून आणलेल्या विहिरीतील पाणी काढण्याची दोरीने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयत आई मनोरंजना हिचा पाठीमागून येवुन हातातील दोरीच्या साह्याने गळा आवळून जीवे ठार मारले.
याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच पोलिसांनी मुलगा सुरेंद्र याला तत्काळ ताब्यात घेतले होते. सायंकाळी उशिरा त्याला अटक करण्यात आली होती. आज त्यांना अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ए डी तिडके यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.